Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 26 November 2009

पैसे तिघांकडून वसूल करण्यासाठी प्रतिज्ञापत्रे

शिरसई कोमुनिदाद गैरप्रकार प्रकरण
पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): शिरसई कोमुनिदादमध्ये झालेल्या गैरप्रकारावरुन आग्नेल डिसोझा, निशीकेत परब आणि पांडुरंग परब या तिघांकडून पैसे वसूल करून घेण्यासाठी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिकादारांतर्फे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. येत्या काही दिवसानंतर कोमुनिदाद संस्थेची निवडणूक होणार असून यावेळी गोव्याशी कोणताही संबंध नसलेल्या सदस्यांना या निवडणुकीत भाग घेण्यास मज्जाव करावा, अशी मागणी यावेळी न्यायालयाकडे करण्यात आली. त्यावेळी "त्यांना मज्जाव करण्यासाठी न्यायालयाची गरज नसून तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर करा',अशी सूचना न्यायालयाने केली.
कोमुनिदादच्या निवडणुकीसाठी राज्याबाहेरील लोकांना आणून मतदान केले जात असल्याचे याचिकादाराच्या विकलाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्याचप्रमाणे यापूर्वीच्या समितीने करोडो रुपयांचा आर्थिक घोटाळा केला असून त्यांची अद्याप बॅंक खात्याचे पास बुक नव्या समितीकडे दिलेला नाही. तसेच करोडो रुपयांची हिशेबही दाखवलेला नाही. त्यामुळे ते पैसे त्यांच्याकडून वसून करून घेतले जावे, अशी याचना याचिकादाराने आपल्या प्रतिज्ञापत्रात केली आहे.
गेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने दोषी व्यक्तींकडून शिरसई कोमुनिदादीचे पैसे का वसूल केले नाहीत, प्रश्न कोमुनिदाद प्रशासनाला आणि राज्य सरकारला केला होता. तसेच या घोटाळ्याचा पोलिस तपास कुठपर्यंत पोचला आहे, याचा संपूर्ण अहवाल देण्याचाही आदेश दिला आहे.

No comments: