पणजी, दि.२१(प्रतिनिधी): वैद्यकीय संशोधन क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज असल्याने या अभ्यासक्रमाला बरीच मागणी आहे. वैद्यकीय क्षेत्राचा होत असलेला विकास व त्यात नवनवीन औषधांची निर्मिती यामुळे या क्षेत्राला बराच वाव असून गोवा विद्यापीठाने सुरू केलेल्या या अभ्यासक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुढील वर्षापासून विद्यापीठात पदव्युत्तर व डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा कुलगुरू डॉ. दिलीप देवबागकर यांनी केली.
आज पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. व्ही. एन. जिंदाल, वैद्यकीय संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. देसाई, बायोइनोवेटच्या व्यवस्थापकीय संचालक गुलजीत चौधरी आदी हजर होते. गोवा विद्यापीठाने बायोइनोवेटच्या सहकार्याने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात हा अभ्यासक्रम सुरू केला होता व त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे गोवा विद्यापीठाने हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करूनही हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना रोजगारही मिळाल्याची माहिती डॉ. देवबागकर यांनी दिली. दरम्यान, या अभ्यासक्रमाच्या शाखा बंगळूर व चेन्नई इथूनही सुरू आहेत. त्या भागातील विद्यार्थी हा अभ्यासक्रम गोवा विद्यापीठाच्या सहकार्याने पूर्ण करू शकतात. हा अभ्यासक्रम अधिकतर या व्यवसायात असलेले लोक करतात व त्यामुळे त्यांना मिळत असलेल्या वेळानुसारच या अभ्यासक्रमाचा वेळ ठरतो. दरम्यान, हा अभ्यासक्रम थेट ऑनलाईनही पूर्ण करण्याची सोय ठेवण्यात आली आहे. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी हा अभ्यासक्रम स्वीकारल्यास त्यांना रोजगार मिळणे शक्य असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
Sunday, 22 November 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment