Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 8 June 2009

नौका व ७ मच्छीमारांना वाचवले

गोवा तटरक्षक दलाची कामगिरी

वास्को, दि. ७ (प्रतिनिधी)- गोव्यामध्ये चालू झालेल्या मुसळधार पावसाची शिकार बनलेल्या मच्छीमार नौकेला व त्याच्यावरील ७ कामगारांना गोवा तटरक्षक दलाच्या जवानांनी आज (दि.७) सुखरूपपणे बचावून समुद्रकिनाऱ्यावर आणले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तटरक्षक दलाने धाडसी कारवाईत वास्कोच्या समुद्र हद्दीपासून २० नॉटीक्लस माईल आत जाऊन ही कारवाई करून जीव धोक्यात असलेल्या मच्छीमारांना वाचवले. तटरक्षक दलाला समुद्रात मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्याने एक मच्छीमार नौका धोक्यात असल्याची माहिती मिळताच त्यांनी त्वरित कारवाई करत दलाच्या एका पथकाला आय. सी. जी. एस. कमलादेवी ह्या जहाजाबरोबर मच्छीमारांचा जीव वाचवण्यासाठी समुद्रात पाठवले. सुरुवातीला मच्छीमार नौकेला शोधण्यासाठी दलाच्या पथकाला मोठ्या प्रमाणात शोध करावा लागला. नंतर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांना ह्या जहाजाचा पत्ता लागला. तटरक्षक दलाचे पथक धोक्यात असलेल्या नौकेच्या मच्छीमारांना वाचवण्यासाठी येत असल्याचे त्यांच्या नजरेस येताच त्यांनी ह्या पथकाला हातवारे करून मदत मागण्यास सुरुवात केली. यानंतर सदर नौकेसमोर पोहोचले असता त्यांना ह्या नौकेचे नाव "सौम्या चेतन' असल्याचे लक्षात आले. काल संध्याकाळपासून तांत्रिक बिघाडामुळे ही नौका समुद्रामध्ये अडकून असल्याचे समजले.
यानंतर तटरक्षक दलाने ७ मच्छीमार आणि नौकेला बुडण्यापासून वाचवून समुद्रकिनारी आणले. यानंतर आज संध्याकाळी ३ वाजण्याच्या सुमारास तटरक्षक दलाच्या जहाजाने सातही मच्छीमार व नौकेसह मुरगाव बंदरावर पोहोचले. सदर मच्छीमार नौका माल्पे, कर्नाटक येथील मोनप्पा कोटीयांन यांच्या मालकीची असल्याची माहिती तटरक्षक दलाच्या सूत्रांनी दिली. सदर मच्छीमारांना व नौकेला पुढच्या कारवाईसाठी मच्छीमार खात्याच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. वेळोवेळी समुद्रात धोक्यात असलेल्यांची मदत करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या तटरक्षक दलाने सदर मोहिमेतून आज पुन्हा एकदा आपली जबाबदारी पूर्ण केल्याचे सिद्ध करून दाखविले आहे.
दरम्यान, कालपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे वास्को शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या असून वास्को अग्निशामक दलाने सदर ठिकाणी जाऊन त्वरित कारवाई करत जनतेला निर्माण झालेला अडथळा दूर केल्याचे दिसून आले आहे.

No comments: