दोषी सिद्ध झाल्यास राष्ट्रवादीतून हकालपट्टी
मुंबई, दि. ८ - पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील आरोपी खासदार पद्मसिंह पाटील यांना कालची रात्र सीबीआयच्या लॉकअपमध्ये काढावी लागली. पण, घरचे जेवण मिळावे, ही पाटील यांची मागणी न्यायालयाने मान्य केल्यामुळे निदान दोन घास घशाखाली उतरण्याची त्यांची सोय झाली आहे. ते दोषी आढळल्यास त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल असे राष्ट्रवादी कॉंग्रेसने जाहीर केले आहे.
आज सकाळी १० वाजता पाटील यांना लॉकअपमधून चौकशीसाठी बाहेर काढण्यात आले. दिवसभर विविध प्रश्नांची सरबत्ती त्यांना सहन करावी लागणार आहे. काल सीबीआयने त्यांची कोठडी मागण्यासाठी अर्ज केल्यानंतर पाटील यांच्या वकिलांनीही एक अर्ज सादर करून पाटील यांना घरचे भोजन मिळण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती केली. न्यायायलाने ती मान्य केली. मात्र, जो माणूस पद्मसिंह पाटलांचा डबा घेऊन येईल, त्याला आधी डब्यातील प्रत्येक पदार्थ स्वत: खावा लागेल आणि हे सर्व सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समोर करावे लागेल, असे निर्देशही न्यायालयाने दिले. १३ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत पद्मसिंग पाटील यांचा हाच क्रम चालणार आहे. कारण न्यायालयाने त्यांना १४ जूनपर्यंत कोठडी दिली आहे. पद्मसिंह हे सीबीआयच्या तपास कार्यात सहकार्य करीत आहेत की नाही, हे १४ तारखेला त्यांना पुन्हा न्यायालयात उपस्थित करण्यात येईल, त्यावेळी कळणार आहे. प्रकरण गंभीर असल्यामुळे पाटील यांच्या कोठडीची मुदत आणखी वाढवून मिळण्याची मागणी सीबीआयकडून केली जाण्याची शक्यता आहेे.
तर राष्ट्रवादीतून हकालपट्टी
पक्षाचे खासदार आणि दुहेरी खून खटल्यात अडकलेले पद्मसिंह पाटील यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास पक्षातून त्यांना ताबडतोब काढून टाकले जाईल, असे आज राष्ट्रवादी कॉंग्रेसने जाहीर केले आहे.
राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि नागरी उड्डयन मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी आज पत्रकारांशी बोलताना ही घोषणा केली. त्यांनी सांगितले की, पाटील यांच्यावरील आरोपांविषयी सध्याच काही बोलणे घाईचे ठरेल. हे प्रकरण चौकशी संघटनांच्या स्तरावर आहे. त्यामुळे पक्षाला त्याच्याशी काहीही देणे-घेणे नाही. पक्ष त्यात काही करू शकत नाही. पण, ज्या क्षणी पवनराजे निंबाळकर खून प्रकरणी पद्मसिंह पाटील यांच्यावरील आरोप सिद्ध होतील तत्क्षणी त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविला जाईल.
कॉंग्रेसने हात झटकले
महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते पद्मसिंह पाटील यांना अटक होणे हा स्वतंत्र खटल्याचा एक भाग असून, त्यात दोन राजकीय पक्षांमधील संबंधांचा कोणताही प्रकार नाही, असा निर्वाळा देत कॉंग्रेसने या प्रकरणी आपले हात झटकले आहेत.
कॉंग्रेसचे प्रवक्ते शकील अहमद यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले की, एका व्यक्तीच्या खूनप्रकरणी दुसऱ्या व्यक्तीला अटक असा हा सरळ-सरळ खटला आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील परस्पर संबंधांचे याच्याशी काहीही देणे-घेणे नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी पाटील यांचा आरोप सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचेही जाहीर केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचा या खून खटल्याशी संबंध नाही, हे स्पष्टच आहे. एका व्यक्तीमुळे संपूर्ण पक्षालाच दोषी मानण्यात अर्थ नाी.
आतापर्यंत माहिती असूनही या प्रकरणी कारवाई न करण्यामागे महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील कारणीभूत आहेत का, यावर बोलताना अहमद म्हणाले की, असे शेकडो खटले असतात जिथे राज्य शासन आणि सीबीआय यांचे दुमत असू शकते. याचा अर्थ या प्रकरणी कारवाई न होण्यास महाराष्ट्राचे गृहमंत्री जबाबदार आहेत, असे म्हणता येणार नाही.
Tuesday, 9 June 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment