Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 12 June 2009

पूजा नाईकला अटक करा : फोंड्यातील जाहीर सभांमध्ये एकमुखी मागणी

फोंडा, दि.११ (प्रतिनिधी) : सीरियल किलर महानंद रामनाथ नाईक याने केलेल्या युवतींच्या खून प्रकरणाची त्याची पत्नी पूजा नाईक हिला सुध्दा कल्पना असण्याची शक्यता असून पूजाची समाजातील वावरण्याची पद्धत संशयास्पद असून पूजाची सखोल चौकशी करण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे पोलिसांनी पूजा नाईक हिला अटक करून तिची चौकशी करावी, अशी मागणी फोंडा येथे सीरियल किलर प्रकरणावरून आज (दि.११) संध्याकाळी घेण्यात आलेल्या दोन सभांतून करण्यात आली आहे. पोलीस पूजा नाईक हिची चौकशी का करीत नाहीत, पूजा नाईकचा गॉडफादर कोण, असे प्रश्न अनेक वक्त्यांनी केले.
पूजा नाईक हिची पोलिसांनी चौकशी न केल्यास सर्व महिलांनी पोलिस स्टेशनवर मोर्चा नेऊन पोलिसांवर दबाव आणला पाहिजे तसेच गोवा महिला आयोगाने तिची चौकशी पाहिजे, असे मोनिका डायस यांनी राजीव गांधी कला मंदिरात महिला आयोगाने आयोजित सभेत बोलताना सांगितले.
सीरियल किलर महानंद नाईक याची पत्नी पूजा नाईक अनेक नावाने समाजात वावरत होती. समाजातील तिचे वागणे संशयास्पद आहे. दवर्ली मडगाव येथील जोतकर यांच्या घरी पूजा नाईक हिचे येणे जाणे सुरू होते. जोतकर घराण्यातील दोन युवती बेपत्ता झाल्यानंतर ती त्यांच्या घरी गेली नाही. अशा ह्या पूजा नाईक हिला कुणी आसरा देऊ नये, असेही श्रीमती डायस यांनी सांगितले.
पूजा नाईक हिला अटक करण्याची मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून केली जात आहे. श्रीमती जोतकर हिने सुध्दा पूजाबाबत संशय व्यक्त केलेला आहे. मात्र, पोलीस यंत्रणा तिला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात टाळाटाळ करीत आहे. पूजा नाईक हिची चौकशी केली तर अनेकांची बिंगे फुटण्याची शक्यता असल्याने याकडे कानाडोळा केला जात आहे, असेही वक्त्यांनी सांगितले. महिला आयोगाच्या अध्यक्ष डॉ. प्रमोद साळगांवकर यांनी सुध्दा पूजा नाईक हिच्या चौकशीची मागणी केली आहे. महानंद नाईक यांच्या खून प्रकरणाची पूजा नाईक माहिती असण्याची शक्यता व्यक्ती केली जात आहे. लोकांकडून पूजाला अटक करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, पोलीस याकडे दुर्लक्ष का करीत आहेत, पोलिसांवर राजकीय नेत्यांकडून दबाव येत आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पूजा नाईक ही एक संस्था सुध्दा चालवत होती. या संस्थेला कुणाकडून पैसा मिळत होता याची करण्याची गरज आहे, अशी मागणी श्रीमती माधवीताई देसाई यांनी खडपाबांध येथे झालेल्या एका चर्चासत्रात केली. खून करण्यात आलेल्या युवतीची कुटुंबे त्रासात आहेत. तर खुन्याची पत्नी पणजीतील हॉटेलात आरामात राहत आहे. पूजाचा गॉडफादर कोण आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पूजाला अटक केल्यास महानंदासंबंधी तिच्याकडून जास्त माहिती मिळू शकते, असे व्ही.डी. नाईक यांनी सांगितले.

No comments: