Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 10 June 2009

सहापदरी महामार्गाविरोधात चर्चिल यांची केंद्राकडे धाव

उच्चस्तरीय शिष्टमंडळासह केंद्रीय मंत्री कमलनाथकडे गाऱ्हाणे

मडगाव, दि.९ (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमांव यांनी आज नवी दिल्लीत आपल्या खात्याच्या सर्व प्रमुख अभियंत्यांसह केंद्रीय भूपृष्ठ व परिवहन मंत्री कमलनाथ यांची भेट घेऊन गोव्यातून जाणाऱ्या पत्रादेवी ते पोळे या राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ च्या सहापदरीकरणासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तयार केलेल्या प्रस्तावाला ठाम विरोध केला व ती आखणी अमलात आणली तर येथील जीवनच उध्वस्त होणार असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष ब्रिजेश्र्वर सिंग व प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी तसेच गोवा सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान अभियंता वाचासुंदर, मुख्य अभियंता चिमुलकर व नेवरेकर हेही हजर होते.
यावेळी चर्चिल यांनी प्राधिकरणाने या महामार्गाच्या सहापदरीकरणाची आखणी करताना स्थानिक सरकारला वा त्याच्या खात्यालाही विश्र्वासात घेतले नाही ही बाब मंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. या आखणीनुसार हजारो निवासी तसेच व्यापारी घरे जमीनदोस्त होणार असून त्यामुळे लोकांमध्ये असंतोष व अस्वस्थता पसरली असल्याचे व त्यातून या आखणीला वाढता विरोध आहे हेही लक्षात आणून दिले.
राज्य सरकारने कमी नुकसान होणारा पर्यायी आराखडा तयार केलेला आहे, तो विचारात घ्यावा तसेच तळपण, गालजीबाग व जुवारी नदीवरील पूल प्राधान्यक्रमाने हातात घ्यावे, अशी मागणीही त्यांनी या बैठकीत केली. केंद्र सरकार या आखणीबाबत कोणतेही आश्र्वासन देऊ शकत नसेल व त्याला विलंब होत असेल तर "बांधा वापरा व हस्तांतरीत करा' या तत्वावर हे काम हाती घेण्यास राज्य सरकार तयार आहे हेही चर्चिल यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे स्पष्ट केले, तेव्हा राज्य सरकारचा हा प्रस्ताव विचारात घेऊन अभ्यास करण्याची सूचना कमलनाथ यांनी प्राधिकरणाला केली.
चर्चिल यांनी केंद्रीय मंत्र्यांना गोवा भेटीचे आश्र्वासन दिेले व या भेटीत या महामार्गाची प्रत्यक्ष पहाणी करता येईल असे सांगितले. ते निमंत्रण स्वीकारून कमलनाथ यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला या आखणीबाबत संपूर्ण अभ्यास करून अहवाल तयार करण्यासही सांगितले.
चर्चिल यांनी मुरगाव बंदरांतील धक्का क्र. ९ च्या विस्तारामुळे ज्या शेंकडो कुटुंबाचे स्थलांतर करावे लागणार आहे तो प्रश्र्नही केंद्रीय मंत्र्यांकडे उपस्थित केला व या लोकांचे व्यवस्थितपणे पुनर्वसन होण्याची गरज प्रतिपादिली.
माविनची भूमिका बदलली
दरम्यान, उपसभापती माविन गुदिन्हो यांनी सहापदरी महामार्गाबाबत गेल्या आठवड्यात घेतलेल्या भूमिकेला छेद देताना अशा रुंदीकरणासाठी मोठ्या प्रमाणात घरे पाडावी लागत असतील तेथे उड्डाण पूल बांधावा, अशी सूचना आज केली. गेल्या आठवड्यात त्यांनी सहापदरी महामार्ग व मोपा विमानतळाचा पुरस्कार करताना तसा एक प्रस्ताव कमलनाथ यांच्याकडे पाठविला होता. पण आज त्यांच्या मतदारसंघातील तसेच नुवे येथील नागरिकांनी त्यांच्या या भूमिकेला विरोध दर्शवून त्यांच्या निवासावर मोर्चा नेला व त्यांना निवेदन सादर केले, त्यानंतर उपसभापतींनी आपली भूमिका बदलली आहे. तेही उद्या नवी दिल्लीकडे प्रयाण करीत असून कमलनाथ यांची भेट घेऊन सहापदरी महामार्गाबाबत त्यांना आपला प्रस्ताव सादर करतील, असे त्यांच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, वीज मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनीही चर्चिल यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला असून, हा महामार्ग आपल्या लोटली मतदारसंघातून जात असल्याने त्याला तीव्र विरोध करू, असे सांगितले.

No comments: