Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 10 June 2009

परदेशी यात्रेवर गेलेल्यांची झाली फसवणूक!

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी) - राज्यात विदेशात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या अनेक रोजगार भरती संस्था आहेत, परंतु गोव्यातील लोकांना विदेशात यात्रेसाठी नेणाऱ्या "टूर ऑपरेटरां' कडूनही लोकांना फसवले जाते, याचा अनुभव अलीकडेच गोमंतकीयांना आला. याप्रकरणी नुकत्याच घडलेल्या प्रकरणाची गंभीर दखल अनिवासी भारतीय आयुक्त एदूआर्द फालेरो यांनी घेतली असून याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.
आज पर्वरी येथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत "असोसिएशन ऑफ क्रृसेडर्स फॉर जिझस विथ मेरी' या संस्थेचे समन्वयक ऍड. एडमंड आंताव यांनी ही माहिती दिली. यावेळी अनिवासी भारतीय आयुक्त एदूआर्द फालेरो व माजी उपसभापती सायमन डिसोझा हजर होते. याप्रकरणी ऍड.आतांव यांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्याहून अलीकडेच ९७ लोक इजिप्त, इस्राईल व जॉर्डन अशा यात्रेला निघाले होते व ही यात्रा गोव्यातीलच एका नामांकित टूर ऑपरेटर्सनी आयोजित केली होती. १७ दिवसांच्या या यात्रेत या समूहातील १४ यात्रेकरूंना थरारक अनुभव आला. मुळात थेट इस्राईल सरकारकडून व्हिसा मिळवून नेलेल्या या लोकांतील १४ यात्रेकरूंना इस्राईल सरकारने व्हिसा नाकारला असतानाही त्यांना या यात्रेसाठी नेल्याने त्यांनी इजिप्त-इस्त्राइल सीमेवर अडवण्यात आले. या १४ लोकांना अडवल्याने यात्रेकरूंची बरीच पंचाईत झाली. एकाच कुटुंबातील काही सदस्यांना मार्ग मोकळा तर काही सदस्य फसले. या १४ पैकी सुमारे ८ यात्रेकरू पुन्हा गोव्यात परतले तर उर्वरित ६ यात्रेकरूंना इस्राइलात प्रवेश करण्यासाठी बरीच कसरत करावी लागली.
हा प्रकार घडल्यानंतर या यात्रेत सामील असलेल्या ऍड.आतांव व माजी उपसभापती सायमन डिसोझा यांनी एदूआर्द फालेरो यांच्याशी संपर्क साधला व त्यांना हा प्रकार कथन केला. श्री.फालेरो यांनी तात्काळ इस्राईलमधील भारतीय दूतावास नवतेजसिंग सर्ना यांच्याकडे संपर्क साधला. यावेळी भारतातील इस्त्राइली दूतावास मार्क सोफर यांनीही सहकार्य केले व अखेर यावर तोडगा काढण्यात आला. त्यांनी यानिमित्ताने घेतलेली भूमिका अपूर्व अशीच होती असे सांगून अखेर या लोकांना कायरो येथील इस्राईल दूतावासाकडून व्हिसा मिळवण्यात आला.
याप्रकरणी इस्राईल सरकारकडून या १४ लोकांना व्हिसा नाकारण्याची कृती निषेधार्ह आहे हे जरी खरे असले तरी टूर ऑपरेटरला ही परिस्थिती ठाऊक असूनही त्यांच्याकडून या यात्रेकरूंना अंधारात ठेवण्यात आल्याची तक्रारही या लोकांनी केली. याप्रकरणी सदर टूर ऑपरेटरकडून थेट इस्राईल सरकारकडून व्हिसा मिळवण्यात आल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. मुळात हे व्हिसा भारतातील इस्राईल दूतावासाकडून मिळवायची पद्धत आहे,अशी माहिती श्री.फालेरो यांनी दिली. या प्रकरणांमुळे टू ऑपरेटर व इस्राईलमधील काही लोकांचे धागेदोरे असून त्यांच्याकडून अशा पद्धतीने व्हिसा मिळवून लोकांना पाठवले जात असल्याचेही उघड झाले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल सरकारने घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती इस्राईल सरकारकडे करणार असेही श्री.फालेरो म्हणाले.

No comments: