Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 10 June 2009

डॉ. विलींचा समर्थकांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसला रामराम

पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही त्याग

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी)- गोवा प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अंतर्गत राजकारणाने आज अचानक उचल खाल्ली. प्रदेशाध्यक्ष डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांनी आज बोलावलेल्या तातडीच्या कार्यकारिणी बैठकीत आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह आपल्या पदाचा राजीनामा दिला व सर्वांनाच चकीत करून टाकले. आपल्या या निर्णयाबाबत ते उद्या १० रोजी जाहीर खुलासा करणार आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षसंघटनेत गेले काही दिवस मोठ्याप्रमाणात फेरफार होण्याची शक्यता वर्तविली जात होती. आज गोवा प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत या शक्यतेचा थेट परिणाम दिसून आला. प्रदेशाध्यक्ष डॉ.विली डिसोझा यांनी आज बोलावलेल्या कार्यकारिणी बैठकीत आपल्या समर्थक सदस्यांसह पक्षाच्या प्राथमिक सदस्यपदाबरोबर पदांचाही त्याग करण्याचा निर्णय घोषित केला. या बैठकीला विधिमंडळ गटाचा एकही सदस्य हजर नव्हता. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा अधिकाधिक कॉंग्रेसच्या जवळ जात असून येत्या काळात हा पक्ष कॉंग्रेस पक्षात विलीन होण्याचे स्पष्ट संकेत मिळत असल्याची प्रतिक्रिया आज डॉ.विली यांनी उपस्थित कार्यकारिणी सदस्यांसमोर मांडली. लोकसभेतील पक्षाची कामगिरी व त्यात पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांनी स्वीकारलेली भूमिका ही या पक्षाचे भवितव्य धूसर असल्याचे स्पष्ट संकेत देत असल्याचेही ते यावेळी म्हणाले,अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान,येत्या काळात हा पक्ष पुन्हा एकदा कॉंग्रेस पक्षात विलीन होण्याचीच दाट शक्यता असल्याने राज्यात त्याचा प्रसार करून काय उपयोग होईल,असा सवालही त्यांनी उपस्थितांसमोर मांडला. दरम्यान, डॉ. विली यांची प्रदेश कार्यकारिणीवर पकड आहे, त्यामुळे त्यांनी आपल्या समर्थकांसह सामूहिक राजीनामा दिला आहे. यावेळी डॉ.विली यांची पाठराखण करणाऱ्या अनेक सदस्यांनी आपले विचार मांडले. पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांना येथील पदाधिकाऱ्यांची चाड नाही तर पक्षाच्या आमदारांचा पक्ष संघटनेत कोणताही वाटा नसल्याने कार्यकर्ता म्हणून काय उपयोग,असा सवाल उपस्थित करण्यात आला.
डॉ.विली यांनी राजीव कॉंग्रेस पक्षाची सगळी ताकद राष्ट्रवादीत ओतली होती. दोन आमदारांची संख्या तीन आमदारांवर गेली. लोकसभेतील ९० हजार मतदानावरून या लोकसभेत ही मतदारसंख्या १ लाख ३१ हजारांवर आली. ही पक्षाची वृद्धी नव्हे काय,असा सवालही यावेळी उपस्थित झाला. दिल्लीतील नेत्यांनाच जर पक्षाची चिंता नसेल तर या पक्षात राहून काहीही उपयोग नाही,त्यामुळे या पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणेच योग्य असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केला. दरम्यान,डॉ.विली यांच्या खास मर्जीतील एका पदाधिकाऱ्याकडून खुद्द पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही टीकेची झोड उडवल्याचीही खात्रीलायक खबर आहे. डॉ.विली यांना लोकसभेची उमेदवारी नाकारून कॉंग्रेस पक्षातून उमेदवार आणून त्याला उमेदवारी दिल्याने सदर पदाधिकाऱ्याचा संताप अनावर झाला होता. शरद पवार हे धर्मांध असल्याचा आरोप करून या पदाधिकाऱ्याने आपला रोष उघडपणे व्यक्त केला.
सरचिटणीस सुरेंद्र फुर्तादो, उपाध्यक्ष फातीमा डिसा, तुलियो डिसोझा आदी पदाधिकाऱ्यांनी डॉ.विली यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, पक्षात नव्याने सामील झालेल्या संगीता परब, प्रा. सुरेंद्र सिरसाट, ऍड. अविनाश भोसले, राजन घाटे आदींनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. पक्षाच्या विधिमंडळ गटालाही अद्याप या निर्णयाबाबत काहीही माहिती नाही,अशावेळी डॉ.विली यांचाहा निर्णय नेमका कोणत्या पद्धतीने पक्षाला मारक ठरेल,हे येत्या दिवसांत स्पष्ट होणार आहे. डॉ.विली यांनी आपल्या समर्थक कार्यकारिणी सदस्यांसह सामूहिक राजीनामा देण्याचा निर्णय घेतला खरा पण हा राजीनामा शरद पवार यांना सादर केल्यानंतरच त्यावर शिक्कामोर्तब होईल. डॉ.विली यांचा पत्ता काटण्यासाठी पक्षांतर्गत सुरू असलेल्या कारवायांची चाहूल लागल्यानेच त्यांनी हा निर्णय घेतल्याने येत्या काळात ते पक्षाच्या विधिमंडळ गटालाही घाम काढणार आहेत,असे संकेत त्यांच्या निकटवर्तीयांनी दिले आहेत.

No comments: