Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 7 June 2009

नेताजीला अटकपूर्व जामीन; प्रकरण दडपण्याचेच संकेत

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी) - पेडणे येथील कथित वेश्याव्यवसाय प्रकरणातील अन्य एक संशयित नेताजी परब ऊर्फ प्रभुदेसाई याचा अटकजामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. दहा हजार रूपये व वैयक्तिक हमीदाराच्या बदल्यात हा जामीन मंजूर झाला. रोज सकाळी ९ ते १२ या वेळात पेडणे पोलिस स्थानकावर हजर राहण्याची अटही घालण्यात आली आहे.
या प्रकरणातील मुख्य संशयित राजेश सावंत याने नेताजी परब याचे नाव आपल्या जबानीत सांगितले होते. नेताजी गेल्या कित्येक दिवसांपासून फरारी होता, असा दावा पेडणे पोलिसांनी केला होता. तथापि, नेताजी याच्या वडिलांनी मात्र आपला मुलगा कामानिमित्त जयपूरला गेल्याचे सांगून तो दोन दिवसांत परत गावात परतणार असे म्हटले होते. यापूर्वी पेडणे पोलिसांकडून नेताजी याला अटक होण्याची दाट शक्यता असल्याने त्याने यापूर्वीच अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पेडणे पोलिसांनी यापूर्वी केलेल्या वक्तव्यानुसार नेताजी याच्याकडून या प्रकरणातील अनेकांच्या नावांचा पर्दाफाश होणार असल्याचा दावा केला होता. आता नेताजी याला जामीन मंजूर झाल्याने पोलिस त्याच्याकडून या टोळीची नावे कशी काय वदवून घेणार हा खरा प्रश्न आहे.
प्रकरण दाबले जाण्याचे स्पष्ट संकेत
दरम्यान,या प्रकरणाचा आढावा घेतल्यास हे प्रकरण दाबले जाण्याची शक्यता या भागातील नागरिकांनी यापूर्वीच वर्तवली होती व सध्या चौकशीची दिशा पाहिल्यास तसेच स्पष्ट संकेत मिळत आहेत. मुळात पेडणे पोलिसच या प्रकरणांत गुंतल्याचा संशय असताना या प्रकरणाचा तपास पेडणे पोलिसांकडे देणे कितपत योग्य होते,हा सवाल महत्त्वाचा आहे. या प्रकरणी सनसनाटी तशीच कायम राहावी व जनतेला हे प्रकरण दाबून टाकले जात आहे याचा संशय येऊ नये यासाठीच काही दिवस राजेश सावंत याला कोठडीत ठेवण्यात आले,असा सवालही नागरिक करीत आहेत. मुळात या प्रकरणी पोलिसांचीच चौकशी होण्याची गरज आहे,अशीही मागणी करण्यात आली आहे.

No comments: