मुख्यमंत्र्यांच्या "प्रगतीपुस्तका'चे प्रकाशन
पणजी, दि. ६ (प्रतिनिधी) - गेल्या दोन वर्षांच्या कालखंडात राज्यातील सामान्यांच्या काळजाला भिडण्याचा प्रयत्न केला. आपल्या सरकारने "आम आदमी'च्या कल्याणार्थ विविध योजना राबवल्या व त्याचे परिणाम नुकतेच दिसू लागले आहेत.सरकारने राबवलेल्या लोकोपयोगी योजनांमुळे सामान्यांचे जगणे सुसह्य व समाधानी व्हावे हा त्यामागचा उद्देश होता आणि तो सफल होत आहे, असे उद्गार मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी काढले.
कामत यांनी विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारची धुरा सांभाळली त्या घटनेला ८ जून रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने या दोन वर्षांच्या काळात विद्यमान सरकारने राबवलेल्या विविध योजना तथा विकासकामांची माहिती करून देणाऱ्या पुस्तिकेच्या प्रकाशन सोहळ्यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा व समाज कल्याणमंत्री सुदिन ढवळीकर हजर होते. माहिती संचालक मिनीन पीरीस, मुख्यमंत्र्यांचे प्रसारमाध्यम सल्लागार सुरेश वाळवे व गोवा मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित श्रीवास्तव हजर होते.
गेल्या दोन वर्षांत प्रसारमाध्यमे,विविध क्षेत्रातील मान्यवर तथा अनेक तज्ज्ञ यांच्याकडून विधायक सूचना आपल्याकडे आल्या. विविध प्रसंगी आपण जास्तीत जास्त लोकांकडे संवाद साधला. सरकारच्या कार्यपद्धतीतील त्रृटींवर टीका झाली,या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊनच सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून आपण योजना आखल्या,अशीही माहिती त्यांनी यावेळी उघड केली. केंद्र सरकारने वेळोवेळी केलेल्या सहकार्याची आठवणही त्यांनी केली. त्यात विशेष करून पंतप्रधान मनमोहनसिंग,श्रीमती सोनिया गांधी, शरद पवार, प्रफुल्ल पटेल,सुशीलकुमार शिंदे,कमलनाथ, बग्रोडीया आदी नेत्यांचे विशेष आभार त्यांनी मानले.
"सेझ'प्रकरणी संशय नको
गोव्यात विशेष आर्थिक विभाग नको हा सरकारचा निर्णय यापूर्वीच घोषित झाला आहे. या ना त्या निमित्ताने वारंवार तो उकरून टीका करणे हे विरोधकांचे काम आहे. माजी केंद्रीय वाणिज्यमंत्री कमलनाथ यांच्याशी याबाबत चर्चा झाली व आता नवनियुक्त मंत्री आनंद शर्मा यांनाही आपण पत्र पाठवले आहे. अधिसूचित "सेझ'कंपन्यांशी चर्चा करून याप्रश्नी तोडगा काढण्याचे काम सुरू आहे. सेझ मान्यता मंडळाने के. रहेजा यांना मुदतवाढ दिली हे खरे असले तरी गोव्यात "सेझ'नको. त्यामुळे या कंपनीकडून काम केले जाणे शक्य नाही. सरकार आपल्या निर्णयाशी ठाम असून कुणीही शंका घेण्याची गरज नाही,अशी ग्वाही त्यांनी दिली.
Sunday, 7 June 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment