Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 8 June 2009

"जनतेचे प्रश्न घेऊन सरकारवर वचक ठेवू'

भाजप नव्या जोमाने कार्यरत होणार

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) - राज्यातील एकूण चाळीस मतदारसंघांपैकी १८ मतदारसंघांत भाजपने आघाडी घेतली आहे. आठ मतदारसंघात केवळ काही फरकाने पक्ष दुसऱ्या स्थानावर राहिला. या सर्व गोष्टींचा आढावा घेतल्यास येत्या काळात राज्यात भाजपला सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहचण्याची चांगलीच संधी असल्याचे प्रतिपादन पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा गोव्याचे प्रभारी राजीव प्रताप रूडी यांनी येथे आज केले. राज्यात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्याकांचा बरा प्रतिसाद भाजपला लाभला. भाजप हा अल्पसंख्याक विरोधी असल्याचा विरोधकांकडून केला जाणारा कांगावा त्यामुळे फोल ठरला आहे. राज्यात सध्या एक विधायक विरोधकाची भूमिकाच भाजप वठवेल व वेळोवेळी जनतेचे प्रश्न घेऊन सरकारवर वचक ठेवेल, असेही त्यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्ष गोवा राज्य कार्यकारिणीची बैठक आज गोमंतक मराठा समाज सभागृहात संपन्न झाली. यावेळी श्री. रूडी यांच्यासह पक्षाचे सहसंघटनमंत्री सतीश वेलणकर, प्रदेशाध्यक्ष श्रीपाद नाईक, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, भाजप विधिमंडळ उपनेते फ्रान्सिस डिसोझा, विधिमंडळ प्रवक्ते दामोदर नाईक, संघटन सचिव अविनाश कोळी आदी हजर होते. केवळ विधायक विरोधकाची भूमिका वठवण्याचे पक्षाचे धोरण आहे. विद्यमान सरकारच्या कार्यपद्धतीचा आढावा आता जनतेनेच घ्यावा, असे रुडी यांनी सांगितले."निराशा व निरुत्साह झटका व पुन्हा नव्या जोमाने कामाला लागा' असा संदेश गोवा प्रदेश भाजप कार्यकारिणी बैठकीत वरिष्ठ नेत्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिला. लोकसभा निवडणूक निकालाचा आढावा,संघटनात्मक कामांची रचना व नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी या बैठकीच्या निमित्ताने करण्यात आली. गोवा प्रदेश भाजपची कार्यपद्धती देशातील भाजपच्या इतर राज्यांसाठी प्रेरणादायक ठरावी, अशी अपेक्षा रुडी यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना श्री. रूडी म्हणाले की , गोव्यातील लोकसभा निकाल भाजपसाठी आशादायी ठरला आहे. उत्तर गोव्यातील श्रीपाद नाईक यांचा विजय आश्वासक होता. मतदार फेररचनेमुळे काही प्रमाणात आघाडी घटली हे त्यांनी मान्य केले.दक्षिणेची जागा केवळ काही फरकाने गेली पण या मतदारसंघात भाजपची कामगिरी प्रेरणादायी आहे व भाजपचा हा तत्त्वतः विजय आहे, असे ते म्हणाले. दक्षिणेत ऍड. नरेंद्र सावईकर यांची उमेदवारी निश्चितच पक्षासाठी फायदेशीर ठरली. भविष्यात दक्षिण गोव्यातही भाजपचा झपाट्याने प्रसार होईल, त्याचे हे संकेत आहेत, असे श्री. रूडी म्हणाले.
भाजपचे आमदार सरकार पक्षात प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत किंवा कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत आदी गोष्टी हा केवळ अपप्रचार आहे व त्यात काहीही तथ्य नसल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले.
लज्जास्पद कालखंड ः श्रीपाद नाईक
विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारच्या कारकिर्दीत गोव्याला शरमेने मान खाली घालायला लावणारे विविध प्रकार घडल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष श्रीपाद नाईक यांनी केली. या कालखंडात प्रत्येक गोष्टीसाठी लोकांना रस्त्यावर उतरावे लागले. अनेक वेळा सरकारने आपले निर्णय जनतेच्या माथी मारण्याचा अटोकाट प्रयत्न केला पण जनतेने तो हाणून पाडला. काही ठिकाणी जनतेच्या दबावाला बळी पडून सरकारने आपले निर्णय फिरवले पण या फिरवलेल्या निर्णयांना अद्याप कायदेशीर स्वरूप देण्यात आले नाही,असा आरोप खासदार श्रीपाद नाईक यांनी केला. विद्यमान सरकारला उद्या ८ रोजी दोन वर्षे पूर्ण होतात,याबाबत त्यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की कुंभकर्णाप्रमाणे दोन वर्षे हे सरकार केवळ झोपून आहे व झोपेचे मोजमाप काय करणार,असा प्रतिसवाल त्यांनी केला.

No comments: