पणजी, दि. ११ (प्रतिनिधी) : पणजी महापालिकेने कचरा विल्हेवाट लावण्यास जागा नसल्याचे कारण पुढे करून गेल्या दोन दिवसांपासून शहरातील कचरा उचलायचे बंद केल्याने पुन्हा एकदा राजधानीतील लोकांना कचऱ्यावरून वेठीस धरले आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याने ढिगारे साचले असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. मासळी तसेच भाजी बाजारात जाण्यासाठी येणाऱ्या लोकांना अक्षरशः नाक दाबून जावे लागते. आज सकाळ पासून बाजारात गेलेल्या अनेकांना या असह्य दुर्गंधीमुळे अनेकांना उलट्या (ओकारी) झाल्याच्या घटना घडल्या.
कांपाल परेड मैदानावर कचरा टाकण्यास या परिसरात राहणाऱ्या स्थानिकांनी विरोध केल्याने हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. परेड मैदानावर टाकण्यात आलेला कचरा येत्या सात दिवसांत उचलला नसल्यास महापालिकेच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा आज पणजी नागरिक कृती समितीने दिला आहे तर, कचऱ्याचा विल्हेवाट लावण्यासाठी आमच्याकडे जागा नसल्याने आम्ही कचरा उचलायचे बंद केल्याचे पणजी महापालिकेच्या महापौर कॅरोलिना पो यांनी सांगितले. यावर तोडगा काढण्यासाठी आज सकाळी पणजी नागरिक कृती समिती व महापौर तसेच अन्य सदस्यांनी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्याने उद्या सकाळी पुन्हा बैठक बोलवण्यात आली आहे.
अतीश आन्तानियो फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली या कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. महापालिकेतर्फे परेड मैदानावर बेकायदेशीर कचरा टाकला जात आहे. त्यामुळे येथील नागरिकांना राहणे असह्य झाले असून मैदानावर टाकण्यात आलेला कचरा त्वरित हटवण्याची मागणी या समितीने केली आहे. त्याचप्रमाणे या मैदानावर उभारण्यात आलेला कचरा प्रक्रिया केंद्रही हटवण्यात यावे अशी मागणी केली आहे.
शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साजलेले असून त्यात आळ्याही तयार झालेल्या आहेत. १८ जून रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका प्रसिद्ध हॉटेलच्या समोरही कचरा भरून मोठ्या पिशव्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्याठिकाणाहून येणाऱ्या लोकांना आणि पर्यटकांनाही या दुर्गंधीच्या सामोरे जावे लागत आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी कांपाल येथील परेड मैदानावर महापालिकेतर्फे टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले होते, तर आता पालिकेनेच कचरा उचलण्याचे बंद करून सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरवले आहे. परेड मैदानावर टाकण्यात आलेल्या कचऱ्याबरोबर मृत झालेले कुत्रेही टाकण्यात येत असल्याने अत्यंत दुर्गंधी येत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्याप्रमाणे पालिकेला कचरा टाकण्यासाठी देण्यात आलेली परवानगी संपुष्टात येऊनही याठिकाणी अजूनही कचरा टाकण्यात येत असल्याचे दावा कृती समितीने केली आहे.
गेल्या वर्षी महापालिकेने परेड मैदानावर कचरा टाकणार नसल्याचे लेखी आश्वासन मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला दिले होते. त्याचप्रमाणे याठिकाणी टाकण्यात आलेल्या कचऱ्यावर कीटक नाशकाची फवारणी करून तो कचरा पूर्णपणे झाकण्यात येणार असल्याचीही हमी दिली होती. परंतु, या लेखी आश्वासनाची पायमल्ली करून पणजी महापालिका याठिकाणी कचरा टाकायचे सुरूच ठेवले होते. पालिकेला याठिकाणी केवळ ओला कचरा टाकण्याची परवानगी यापूर्वी देण्यात आली होती.
Friday, 12 June 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment