Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 8 June 2009

अडवलपालमध्ये घरांत घुसले खाणीचे पाणी

डिचोली, दि. ७ (प्रतिनिधी)- काल झालेल्या जोरदार पावसामुळे अडवलपाल येथील खनिज खाणींवरील पाण्याचे लोट गावात घुसल्यामुळे नागरिकांचे बरेच हाल झाले. आज अडवलपाल येथे उपजिल्हाधिकारी केनावडेकर, संयुक्त मामलेदार ब्रिजेश मणेरकर, तलाठी श्री. नाईक आदींनी भेट देऊन खनिज प्रकल्पातून आलेल्या व घरात घुसलेल्या पाण्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करून आढावा घेतला.
मधलावाडा, अडवलपल येथील आत्माराम नाईक, लवू नाईक, विजय पाडलोस्कर, पांडुरंग परब आदी नागरिकांनी घरात खनिज मिश्रित पाणी घुसल्यामुळे सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार केली आहे.
मानसवाडा मुळगाव येथील नागरिकांनीही कालच्या पावसामुळे घरात पाणी घुसून नुकसान झाल्याची तक्रार केली आहे. येथील वामन मांद्रेकर, तुकाराम मांद्रेकर आदींनी सुमारे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची तक्रार केली आहे.
मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार तडाख्यामुळे इथल्या पूरनियंत्रण व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. डोंगरमाथ्यावर कोसळणारे मुसळधार पावसाचे पाणी नाल्यांतून येऊन डिचोली नदीला मिळते. पण डिचोलीतही मुसळधार पाऊस व तुंबलेली गटारे यांमुळे पहिल्याच पावसाच्या दणक्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली. आज सकाळपासून पावसाला जोर नसला तरी रात्री उशिरा जोरदार वर्षाव झाला. या भागात असाच पाऊस पडत राहिल्यास सखल भागात पूर येऊ शकतो. यासाठी येथील नागरिक, दुकानदार यांनी सतर्कता बाळगून आपल्या सामानाची आवराआवर केली आहे. दरम्यान गावकरवाडा, डिचोली येथील जयश्री परब यांच्या घरावर झाड कोसळून सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले.

No comments: