संचालकांची कबुली
पणजी, दि. ८ (प्रतिनिधी) - आरोग्य पातळीवर राज्यात साधनसुविधा निर्माण होत असल्या तरी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाचा तुटवडा जाणवतो आहे. खात्यासमोर डॉक्टर व इतर तांत्रिक कर्मचाऱ्यांची उणीव भासत असल्याने व विशेष करून ग्रामीण भागांतील इस्पितळांत काम करण्यास कुणीही राजी होत नसल्याने आरोग्य खात्यासमोर बिकट परिस्थिती निर्माण झाल्याचे आज खुद्द आरोग्य खात्याच्या संचालिका डॉ.राजनंदा देसाई यांनी मान्य केले.
आरोग्य खात्याच्या अस्थायी समितीसमोर उपस्थित झालेल्या विविध समस्या व अडचणींबाबत खुलासा करताना त्यांनी ही माहिती दिली. आमदार दीपक ढवळीकर यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आलेल्या या बैठकीत आमदार प्रताप गांवस,दामोदर नाईक व फ्रान्सिस डिसोझा आदी हजर होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने नेमलेल्या विशेष समितीने राज्यातील आरोग्य खात्याच्या कारभाराबाबत तयार केलेल्या अहवालात अनेक त्रृटी समोर आणल्या आहेत. हा अहवाल अद्याप खात्याला व गोवा वैद्यकीय महाविद्यालयालाही पोहचला नसल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या अहवालाबाबत सरकारने कोणती उपाययोजना केली याचा खुलासा सरकारला देणे भाग असल्याने त्याची तयारी सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. गोमेकॉचे अधीक्षक डॉ.राजन कुंकळ्ळीकर, डीन डॉ.जिंदाल, सचिव दिवानचंद, संजीव श्रीवास्तव व श्री.वासनीक हजर होते. सध्याच्या परिस्थितीत फोंडा, मडगाव,साखळी आदी ठिकाणी इस्पितळांची कामे सुरू आहेत, तर म्हापसा येथे जिल्हा इस्पितळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.या इस्पितळांसाठी मनुष्यबळ कसे काय पुरवणार, याबाबत सरकारकडे काही योजना आहे काय,असा सवाल केला असता अधिकाऱ्यांनी मौन धारण केले. या इस्पितळांत स्थानिक युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी आवश्यक तांत्रिक अभ्यासक्रम अथवा इतर साहाय्यक पदांसाठी मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याची सूचना याठिकाणी उपस्थित काही नागरिकांनी केली. येत्या काळात बिकट परिस्थिती निर्माण होण्याचा धोका असून या इस्पितळांत काम करण्यासाठी इतर राज्यांतून मनुष्यबळ आणावे लागेल,अशी भितीही यावेळी अनेकांनी वर्तविली.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांची परवड सुरू असल्याच्या अनेक तक्रारी यावेळी उपस्थित करण्यात आल्या. मोफत औषधांची सरकारकडून घोषणा झाली पण त्याचा लाभ गरीब रुग्णांना मिळत नसल्याचे आमदार फ्रान्सिस डिसोझा यांनी सांगितले. अनेक वेळा रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी बोलावण्यात येते व दिवसभर त्यांना बसवून परत पाठवले जाते,अशा तक्रारीही पुढे येत असल्याची माहिती त्यांनी दिली. गोमेकॉत पाण्याची टंचाई जाणवत असल्याने त्याचा परिणाम साफसफाईवर होतो व येथील शौचालयांची परिस्थिती एकदम बिकट असल्याची माहितीही उघड करण्यात आली. गोमेकॉत परप्रांतीयांची गर्दी उसळत असल्यानेही अनेकांनी लक्षात आणून दिले. शेजारील राज्यांतील लोक वैद्यकीय उपचारांसाठी गोमेकॉत येत असल्याने स्थानिक लोकांची परवड होते त्यामुळे गोमंतकीयंसाठी विशेष ओळखपत्र वितरित करण्याचीही गरज आहे,असाही प्रश्न यावेळी उपस्थित झाला. मूळ गोमंतकीयांसाठी बहुउद्देशीय ओळखपत्र तयार करण्याची नितांत गरज आहे, अन्यथा सरकारच्या विविध योजनांचा गैरवापर होण्याची शक्यता जास्त असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. बेतकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत मोडकळीस आली आहे, त्याबाबत खात्याने तात्काळ कारवाई करावी,अशी मागणीही येथील काही नागरिकांनी केली. ग्रामीण भागांत केवळ आठवड्यातून दोन दिवस डॉक्टर जातात व तेही अर्धवेळ अशावेळी येथील लोकांनी काय करावे,अशी तक्रार या भागांतून आलेल्या काही नागरिकांनी केली. दरम्यान,यावेळी डॉक्टरांची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत असल्याचे डॉ.राजनंदा देसाई यांनी सांगितले.
Tuesday, 9 June 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment