८० वृक्ष उन्मळले
किमान ५० लाखांची हानी
वीज व रस्तावाहतूक बंद
मडगाव, दि. ७ (प्रतिनिधी) : काल उत्तररात्री येथील राय परिसरातील सांतेमळ भागाला चक्रीवादळाचा तडाखा बसून सुमारे ८० झाडे उन्मळून पडली व अंदाजे ५० लाखांची हानी झाली. घरांवर, रस्त्यांवर व वीजतारांवर पडलेली झाडे कापून बाजूला काढण्याचे काम आज सायंकाळपर्यंत चालू होते व अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार ते रात्री १० वाजेपर्यंत चालणार आहे. सुदैवाने या नैसर्गिक आपत्तीत जरी जीवितहानी झालेली नसली तरी मालमत्तेचा विध्वंस फार मोठा झालेला आहे.
काल मध्यरात्रीपासून मडगावपासून १० कि. मी.च्या अंतरावर निसर्गाचे हे तांडव चालू असताना येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्कालीन कक्षाला या वादळाची गंधवार्ताही नव्हती. परवा शुक्रवारीच स्वतः मुख्यमंत्र्यांनी हा कक्ष चोवीस तास कार्यरत करण्याची सूचना केलेली होती.
राय येथे चक्रीवादळाची प्रत्यक्ष पाहणी केली असता वादळाचा प्रताप पाहावयास मिळतो. या वावटळीत उन्मळून पडलेल्या झाडांमुळे सांतेमळ ते राय हा रस्ता वाहतुकीस बंद झालेला आहे. मध्यरात्रीच्या वादळाचा जोर पहाटे कमी झाला पण नंतर पुन्हा एक तडाखा बसला. काही भागात उन्मळलेली झाडे घरांवर पडली व त्यात सुमारे २० घरांची जबर हानी झाली. एका ठिकाणी एका गोठ्यावर झाड पडल्यामुळे आतील ३ गायी जखमी झाल्या.
विविध भागांत पडलेली झाडे बाजूला काढण्याचे काम अग्निशामक दलाकडून चालू असून ते पूर्ण व्हायला आज रात्रीचे १० वाजून जातील असे सांगण्यात आले. आज दुपारची देखील विश्रांती न घेता त्यांचे काम चालू आहे. काल रात्रीपासून वीज पुरवठा खंडित झाल्याने काळोखात बुडालेल्या राय परिसरातील काही भागात पूर्ववत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम वीज खात्याने आज सायंकाळपर्यंत केले पण तरीही अर्धेअधिक भाग काळोखातच होता.
स्थानिक आमदार रेजिनाल्ड आज दिवसभर या भागात तळ ठोकून मदतकार्यावर लक्ष ठेवून होते. नुकसानीचा आकडाही त्यांनीच दिला. अग्निशामक दलाचे जवान मदतकार्यात गुंतून असल्याने त्यांच्याकडून विशेष अशी कोणतीच माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. उपजिल्हाधिकारी जॉन्सन फर्नांडिस यांनी आज दुपारी वादळग्रस्त भागाचा दौरा केला.
Monday, 8 June 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment