Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 9 June 2009

प्रख्यात नाट्यकर्मी हबीब तन्वर निवर्तले

भोपाळ दि. ८ (प्रतिनिधी) - हिंदी रंगमंचावरील प्रख्यात रंगकर्मी हबीब तन्वर यांचे आज सकाळी येथील एका इस्पितळामध्ये निधन झाले. मृत्युसमयी ते ८५ वर्षांचे होते व दीर्घकाळापासून आजारी होते. सर्जनशीलता, व्यासंग, नव्याचा ध्यास आणि रंगमंचावर नवनवे प्रयोग करणारे तन्वर यांनी जीवनात नेहमी साधेपणाचीच कास धरली, त्यामुळे आपले शिष्यगण, मित्र, आप्तेष्ट यांच्यात ते कमालीचे लोकप्रिय होते.
चरणदास चोर व आगरा बाजार या सारख्या नाटकातून लाखो नाट्य रसिकांच्या ह्रदयावर त्यांनी राज्य केले. शतरंज के मोहरे, लाला शोहर राय, मिट्टी की गाडी, गाव का नाम ससुराल, हमारा नाम दामाद, पोंगा पंडित, जिसने लाहोर नही देखा या सारख्या असंख्य नाटकांद्वारे त्यांनी रंगमंचावर अक्षरशः राज्य केले. "जहरीली हवा' हे भोपाळ विषारी वायू पीडितांवरील त्यांचे नाटकही कमालीचे गाजले. पद्मश्री, पद्मभूषण या सारख्या पुरस्कारांनी सन्मानित झालेले व राज्यसभा सदस्य होण्याचा मान मिळालेले तन्वर यांची नाट्य क्षेत्रातील अभिरुची उच्च कोटीची होती. प्रयोगशीलता हा त्यांच्या स्वभावाचा स्थायिभाव होता, परंतु आपल्या स्वभावातला उपजत साधेपणा त्यांनी शेवटपर्यंत टिकवला.

No comments: