Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 13 February 2009

मुंबईवरील हल्ल्याचा कट पाकमध्ये शिजला

पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांची कबुली
...आठ आरोपींविरुद्ध तक्रार दाखल
...सहा अतिरेक्यांना अटक
... भारताकडून हवे ३० प्रश्नांचे उत्तर


इस्लामाबाद, दि. १२ - टाळाटाळ केल्यानंतर भारतासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरून विशेषत: अमेरिकेच्या वाढत्या दबावामुळे अखेर नाईलाजाने मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचे षडयंत्र पाकमध्ये रचल्याचे पाकिस्तानने कबुल केले असून याप्रकरणी सहा आरोपींना अटक झाल्याची माहिती दिली आहे.
मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यासंदर्भात भारताने दिलेल्या पुराव्यांचे उत्तर पाकिस्तानने ३० प्रश्नांच्या यादीसह भारतीय उच्चायुक्त सत्यव्रत पॉल यांना सोपविले आहे.
पाकने दिलेल्या उत्तरात पाकिस्तानने मुंबईवरील हल्लेखोरांच्या बोटांचे ठसे, डीएनए नमुने आणि आणखी पुरावे भारताकडे मागितले आहेत. मुंबईवरील हल्ल्याच्या काही भागाचे षडयंत्र पाकिस्तानमध्ये रचण्यात आले अशी कबुली पाकचे गृहमंत्री रहमान मलिक यांनी दिली. पाकिस्तानी नेतृत्वाने यासंदर्भात अनेक दिवस दिशाभूल केल्यानंतर प्रथमच अशी जाहीर कबुली दिली आहे. मुंबईवरील हल्ल्यासंदर्भात गुरुवारी दाखल तक्रारीत ८ लोकांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आले असून सहा जणांना अटक केल्याचे मलिक म्हणाले.
मुंबईवरील हल्ल्यात सहभागी काही अतिरेकी लष्कर-ए-तोयबाचे सदस्य असून प्राथमिक चौकशीच्या आधारे अटकसत्र राबविण्यात आलेल्याचे मलिक यांनी पॉल यांना भेटीदरम्यान सांगितले. भारत सातत्याने प्रयत्न करीत असल्यामुळे पाकिस्तानवर लष्कर-ए-तोयबा व त्यांची मुख्य संघटना जमात-उद-दावावर कठोर कारवाई करण्याकरिता चांगलाच दबाव आहे. मुंबईवरील हल्ल्याचा कट रचल्याचा या संघटनेवर आरोप असून हल्ल्यात सुमारे २०० लोक मारले गेले होते. एफआयआर दाखल केल्यामुळे आता वास्तविक चौकशीला सुरुवात होणार असे मलिक यांनी स्पष्ट केले. या भारतावरील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यासाठी पैसा पुरविल्याच्या आरोपात हमद अमीन सादिकला अन्य एक पाकिस्तानी नागरिक जावेद इक्बालसह अटक झाली असून त्याने स्पेनमधून व्हीओआयपी (व्हाईस ओव्हर इंटरनेत प्रोटोकॉल) संपर्क स्थापित केला होता अशी माहिती मलिक यांनी एका पत्रपरिषदेत दिली.
मुंबईवरील हल्ल्यादरम्यान जिवंत अटक झालेला एकमेव दहशतवादी अजमल अमीर कसाबचे बयाण पाकिस्तानी न्यायालयात नोंदविले जाईल. यासाठी २२ वर्षीय कसाबला ताब्यात घेण्याची पाकची इच्छा आहे. अतिरेक्यांनी कराचीतील ज्या दुकानातून बोटींचे इंजिन खरेदी केले होते. त्या दुकानाचा शोध लागला असून दुकानाच्या मालकालाही अटक केली आहे. या दुकान मालकाला अतिरेक्यांनी मोबाईल क्रमांक दिला होता. त्या आधारे पाकिस्तानी पोलिसांनी दहशतवाद्यांच्या कराचीतील सहकाऱ्यांचे बॅंक खाते शोधून काढले. व त्यांना अटक केल्याची माहिती मलिक यांनी दिली.
................

No comments: