पणजी, दि. ११ (प्रतिनिधी) - शिर्डी साईबाबा पादुका दर्शन सोहळ्याची तयारी जय्यत सुरू असून दि. २१ फेब्रुवारी सायंकाळी ५ वाजता साई पादुकांचे आगमन मालपे - पेडणे येथे होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री दिगंबर कामत तसेच अन्य आमदार व साईभक्त रथाचे स्वागत करणार असल्याची माहिती साई पादुका दर्शन सोहळा समितीचे अध्यक्ष अनिल खंवटे यांनी दिली. यावेळी शिर्डी साई संस्थानचे विश्वस्त डॉ. एकनाथ गोंधकर, अशोक खांबेकर, प्रदीप पालेकर, श्री. पार्सेकर उपस्थित होते. दि. २२ फेब्रुवारी रोजी पहाटेपासून साई पादुकांचे दर्शन घेण्याची संधी भक्तांना लाभणार असल्याचे श्री. खंवटे यांनी सांगितले.
कांपाल येथे भव्य शामियाना उभारण्यात येणार असून याठिकाणी कडेकोट सुरक्षा ठेवण्यात येणार आहे. तसेच पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांना कोणताही अडचण होणार नाही, याची काळजी घेतली जाणार असल्याची हमी यावेळी खंवटे यांनी दिली. सुरक्षेच्या विषयी विचारविनिमय करण्यासाठी दि. १६ फेब्रुवारी रोजी पोलिस तसेच अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत खास बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सुमारे एक लाख साई भक्त याठिकाणी दर्शनाला येणार असून साई भजन आणि महाभोजनाची व्यवस्था केली जाणार असल्याचे ते म्हणाले.
शिर्डीतील चावडीला दि. १० डिसेंबर २००९ रोजी शंभर वर्षे पूर्ण होत असल्याने शिर्डी साई मंदिर संस्थानाने शताब्दी महोत्सवाचे आयोजन केले आहे. यानिमित्त आयोजित देशातील पहिले साई भक्तांचे संमेलन आयोजित करण्याचा मान गोव्याला मिळाल्याचे यावेळी डॉ. गोंधकर यांनी सांगितले. देशात तसेच विदेशात साईबाबांचे मोठ्या संख्येने भक्त आहेत. सर्व भक्तांना शिर्डी येथे येऊन पादुकांचे दर्शन घेणे शक्य होत नसल्याने देशातील काही प्रमुख राज्यात साईंच्या पादुकांचा नेण्याचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गोव्यात ५२ तर देशात ४ हजाराहून जास्त साईबाबांची मंदिरे आहेत. तसेच विदेशातही अनेक मंदिरे आहेत. शिर्डीनंतर १९२२ साली कुडाळ येथे साईबाबांचे पहिले मंदिर उभे राहिले. परंतु, काही ठिकाणी साई मंदिरात बाबांची समाधी बांधली जात असून ते योग्य नसून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे श्री. खांबेकर यांनी सांगितले. तसेच काही व्यक्ती साईंचे वंश असल्याचेही सांगत असून साईंचा कोणीच वंशज नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Thursday, 12 February 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment