पणजी, दि. १० (प्रतिनिधी): अमली पदार्थ विरोधी पथकाने आज मळा पणजी येथील तळ्याजवळ छापा टाकून १ किलो १० ग्राम "ब्राऊन शुगर' जप्त केली. सुमारे २० लाख रुपयांच्या या "ब्राऊन शुगर'ची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात १ कोटी रुपये होत असल्याची माहिती या पथकाने दिली. या घटनेमुळे समुद्र किनाऱ्यावर होणारे अमली पदार्थ तस्करीचे व्यवहार राजधानीपर्यंत पोचल्याचे उघड झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात "ब्राऊन शुगर' जप्त करण्याची नजीकच्या काळातील ही सर्वांत मोठी घटना आहे. पोलिसांनी या प्रकरणात बालमर राजस्थान येथील तेज सिंग (२६) या तरुणाला रंगेहाथ अटक केले असून पोलिस कोठडी मिळवण्यासाठी उद्या सकाळी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
सदर अमली पदार्थ एका विदेशी व्यक्तीला देण्यासाठी आपण येथे आल्याची कबुली संशयिताने दिली आहे. परंतु, त्याने दिलेल्या माहितीत किती तथ्य आहे, याचा तपास पोलिस करत आहेत. खास सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संध्याकाळी ४.३० वाजता हा छापा टाकण्यात आला. मिळालेल्या वर्णनानुसार मळ्यातील तळ्याजवळ एक तरुण उभा असल्याचे दिसताच आधीच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडे असलेल्या एका बॅगेमध्ये "ब्राऊन शुगर' आढळून येताच त्याला अटक करण्यात आली. सदर तरुण गेल्या काही दिवसांपूर्वी गोव्यात दाखल झाला होता. पिळर्ण येथे एका भाड्याच्या खोलीत तो आपल्या मित्रांबरोबर राहत होता, अशी माहितीही उपलब्ध झाली आहे. "ब्राऊन शुगर' कोणत्या दर्जाची आहे, हे पाहण्यासाठी त्याचे काही नमुने हैद्राबाद येथील फोरेन्सिक लॅबमध्ये पाठवले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
अमली पदार्थ विरोधी पथकाचे उपअधीक्षक नरेश म्हामल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पुनाजी गावस, पोलिस शिपाई श्याम परब, हरी नाईक, दिना मांद्रेकर, साईश पोकळे, महादेव नाईक, रामदास काणकोणकर व नागेश पार्सेकर यांनी या कारवाईत भाग घेतला. याविषयीचा अधिक तपास उपनिरीक्षक गावस करीत आहे.
Wednesday, 11 February 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment