Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 14 February 2009

कोरोमंडल एक्सप्रेस घसरली

ओरिसातील घटना, २४ ठार, २०० जखमी

भुवनेश्वर, दि. १३ - एकीकडे, संसदेत रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी निवडणुकीचा लोकप्रिय रेल्वे अर्थसंकल्प मांडून त्यावरील शाई ओली असतानाच ओरिसातील जयपूर रोड स्थानकावर आज कोरोमंडल एक्सप्रेसचे चौदा डबे रुळावरून घसरल्याने किमान २४ प्रवासी ठार, तर सुमारे दोनशेहून अधिक जण जखमी झाले. शुक्रवारी रात्री उशिरा हा भीषण अपघात घडला.
पश्चिम बंगालमधील हावडा येथून ही एक्सप्रेस चेन्नईला निघाली होती. अपघाताचे वृत्त समजताच मदत पथकांनी मोठ्या प्रमाणावर साह्यताकार्य सुरू केले. जखमींना नजीकच्या विविध इस्पितळांत दाखल करण्यात आले आहे. ओरिसाचे अर्थमंत्री प्रफुल्ल घाडई व बालकल्याण मंत्री प्रमिला मॅलिक यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत पथकांना मार्गदर्शन केले. जेथे अपघात झाला तेथे दाट काळोख असल्यामुळे मदत पथकांच्या कामात अडथळे येत आहेत. त्यामुळे मृत व जखमींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या भयंकर अपघातात रेल्वेचे डबे एकमेकांवर चढल्यामुळे मृत व जखमींना खास कटर्सद्वारे डब्यांचे दरवाजे कापून बाहेर काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. अपघातस्थळीचे दृश्य अत्यंत करुण दिसत होते. मदतीसाठी प्रवासी जीवाच्या आकांताने ओरडत होते. कोण जिवंत आहे व कोणाचा मृत्यू झाला हे समजण्यास मार्गच नव्हता. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाच्या चेहऱ्यावर भीतीची छाया दिसत होती. या अपघातानंतर संबंधित मार्गावरील सर्व गाड्या रद्द करून रेल वाहतूक भुवनेश्वर व संभलपूरमार्गे वळवण्यात आली आहे. हा अपघात नेमका कशामुळे घडला हे अजून स्पष्ट झालेले नाही. अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच मृत व जखमींच्या नातेवाइकांना भरपाई जाहीर करण्यात आली आहे. या अपघातात तीन डबे चक्क रेल्वेच्या इंजिनावरच चढल्यामुळे मदत पथकांचे काम आणखी कठीण झाले आहे.

No comments: