पणजी, दि. १० (प्रतिनिधी): 'जन औषधी' कार्यक्रमांतर्गत काही महत्त्वाची औषधे अल्प दरात दिली जाणार असून त्यासाठी देशाच्या प्रत्येक तालुक्यात एक केंद्र उभारले जाणार आहे. तसेच खनिजाच्या निर्यातीवर अंकुश न ठेवल्यास एक दिवस आम्हालाच खनिज आयात करावी लागणार असल्याने ६२ ग्रेडच्या खनिजावर निर्यातकर वाढवण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे खताचे उत्पादन वाढवण्यासाठी विदेशात खाणी सुरू करण्याचा मंत्रालयाचा विचार असल्याची माहिती आज केंद्रीय रसायन, खत व पोलादमंत्री रामविलास पास्वान यांनी आज येथे दिली.
यावेळी पास्वान यांच्यासोबत रसायने व खत मंत्रालयाचे अन्य अधिकारी उपस्थित होते. रसायन व खत मंत्रालयाच्या हिंदी सल्लागार समितीच्या चौथ्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पास्वान गोव्यात दाखल झाले आहेत. या बैठकीत हिंदीचा वापर आणि हिंदीचा प्रसार यावर चर्चा करण्यात आली.
गोव्यात "जन औषधी' केंद्र सुरू करण्यासाठी गोव्याच्या मुख्य सचिवांशी संपर्क साधण्यात आला आहे. या केंद्रासाठी जागा उपलब्ध झाल्यास आणि एखादी सामाजिक संस्था पुढे आल्यास त्वरित हे केंद्र सुरू केले जाणार असल्याचे पासवान म्हणाले.
सध्या पंजाब व हरयाणा या राज्यात ही केंद्र सुरू झाली असून याठिकाणी २० रुपयात मिळणारी औषधे २.५० रुपये तर, ११६ रु. किमतीची औषधे ३१.५० रुपयांपर्यंत मिळणार आहेत. दिवसाचे चोवीस तास हे केंद्र सुरू राहणार असून समाजातील कोणत्याही व्यक्तीला या सुविधेचा लाभ घेता येईल.
स्वस्तात औषधे उपलब्ध करण्यासाठी ७६ कंपन्यांनी अर्ज दाखल केले असून ३५० प्रकारची औषधे या केंद्रात रास्त दरात उपलब्ध केली जाणार असल्याचे मंत्री म्हणाले.
देशात पोलादाच्या उत्पादनात ४५ लाख टनांवरून ५६ लाख टन वाढ झाली आहे. २०२० सालापर्यंत १२४ लाख टन पोलाद उत्पादनाचे लक्ष्य ठरवण्यात आले आहे. तसेच ५९ हजार कोटी रुपये खर्च करून नवीन पोलाद प्रकल्प देशात उभारले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. भारतात गॅस तसेच खताच्या उत्पादनाची कमतरता भासत आहे. त्यासाठी जॉर्डन, ऑस्ट्रेलिया, सीरिया, मोरोक्को आदी देशात फॉस्फेटच्या खाणी सुरू करण्याचा सरकारचा विचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, हिंदी सर्वसमावेशक करण्यासाठी सरकारी खात्यातील फाईलवर शेरा मारताना हिंदीचा वापर केला जावा, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. कोणतीही खाजगी सौंदर्य प्रसाधन कंपनी आपल्या उत्पादनाची जाहिरात तसेच त्यावरील मुद्रित मजकूर हिंदीतून देईल तर अशा कंपन्यांना १ लाख व ५५ हजार रुपयांचा पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती पास्वान यांनी दिली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment