Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 10 February 2009

विमानातून दाखल झालेले "हाय प्रोफाईल' चोर जेरबंद

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी) - विमानातून गोव्यात आलेल्या दोघा अट्टल चोरांना आज मिरामार येथील एका बंगल्यात चोरी करताना रंगेहाथ पकडण्यात आले. रशीद अब्दुल रौफ (३२) व खशिफ अली (३२) अशी त्याची नावे असून दोघेही रामपूर (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी आहेत. थेट विमानातून गोव्यात येऊन मोठ मोठ्या बंगल्यात हात साफ करून पोबारा करण्याचे तंत्र या "हाय प्रोफाईल' चोरांनी अवलंबले आहे. एरव्ही खाजगी वाहन किंवा रेल्वेतून येणाऱ्या चोरांनी आपले प्रवासाचे साधन बदलल्याने पोलिसही अचंबित झाले आहेत.
याविषयी सविस्तर माहितीनुसार मिरामार येथील कीर्ती लवंदे दुपारी १ वाजण्याच्या सुमारास जेवण्यासाठी घरी आल्या असता दोन चोर बंगल्यात घुसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी त्यांनी एकाला जेरबंद केले तर, त्या ठिकाणी जमलेल्या लोकांनी दुसऱ्याला पकडले. उपस्थित लोकांनी या दोघांना यथेच्छ चोप दिल्यावर पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी दोघांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलिस कोठडी मिळवण्यासाठी उद्या सकाळी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
अटक झालेले चोरटे काल सकाळी एअर इंडियाच्या विमानातून थेट दिल्लीहून गोव्यात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी पणजीतील एका अलिशान हॉटेलमध्ये आपले बस्तान मांडले आणि आज सकाळी राजधानीत चोरी करण्यासाठी बाहेर पडले. कीर्ती लवंदे यांच्या बंगल्यात घुसण्यापूर्वी त्यांनी "कामत क्लासिक'मधील एका सदनिकेत चोरी केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. परंतु, अद्याप यासंदर्भात पोलिस तक्रार करण्यासाठी कोणीही आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर दुपारी १ च्या दरम्यान दोघांनी आपला मोर्चा लवंदे यांच्या बंद असलेल्या बंगल्याकडे वळवला. दुपारी बंगल्यात कोणीही नसल्याचा फायदा उठवून त्यांनी बंगल्याचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. यानंतर काही मिनिटांतच सौ. लवंदे बंगल्यावर पोचल्या. यावेळी त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता दार आतून बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी दरवाजाच्या फटीतून आतमध्ये डोकावले असता त्यांना दोघांची सावली दिसली. यावेळी तिने आरडाओरडा केला असताना दोघेही पळण्यासाठी बाहेर आले असता त्यांना पकडून जमावाने बराच चोप दिला.
पोलिसांनी त्यांच्याकडून सौ. लवंदे यांच्या बंगल्यातून चोरलेले तीन नवे कोरे शर्ट, एक टी-शर्ट तसेच सात हजार रोख रक्कम जप्त केली आहे. तसेच कुलूप तोडण्यासाठी वापरण्यात आलेले एक हत्यारही ताब्यात घेण्यात आले आहे. याविषयीचा अधिक तपास पणजी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक नारायण चिमूलकर करीत आहे.

No comments: