Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 9 February 2009

निवडक लक्ष्यांवर हल्ला शक्य

लष्कर प्रमुखांची स्पष्टोक्ती

दिल्ली, दि. ८ - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातील निवडक दहशतवादी शिबिरांवर अचूक हल्ल्याचा पर्याय खुला असून असे हल्ले लष्कराद्वारे शक्य असल्याची स्पष्टोक्ती लष्कर प्रमुख जन. दीपक कपूर यांनी दिली.
निवडक लक्ष्यांवर हल्ला करणे लष्कराला शक्य असले तरी यावर अंतिम निर्णय होईल की नाही हा देखील एक वेगळाच मुद्दा आहे. निवडक दहशतवादी शिबिरांवर हल्ले शक्य आहेत काय, असे विचारले असता कपूर यांनी होय असे उत्तर दिले. ते म्हणाले विमानांद्वारे, तोफखान्याद्वारे, अगदी सरळ किंवा अन्य कोणत्याही माध्यमांद्वारे हल्ला शक्य आहे.
सरकारने अशा हल्ल्याला संमती दिली तर लष्कर यासाठी सज्ज आहे काय, या प्रश्नावर त्यांनी लष्कर तयारीत असून काश्मीरसह उत्तरेकडील आघाडीवर दक्ष असल्याचे सांगितले.
केवळ हल्ला चढवायचा आहे म्हणून ही तयारी नव्हे तर ती कोणत्याही स्थितीत असते, असेही त्यांनी स्पष्ट केले. हृदयावरील शस्त्रक्रियेमुळे मागच्या महिन्यात पंतप्रधान मनमोहन सिंग रुग्णालयात होते. त्यावेळी अण्वस्त्र कमांडबाबत अनिश्चिततेचे वातावरण होते काय, यावर बोलताना कपूर म्हणाले की, असे वृत्त कधी कधी उगाच प्रसार माध्यमांमध्ये येत असते. परंतु खरी बाब अशी की, डॉ.सिंग यावर कधीच बोलले नाहीत. यासंदर्भात कोणताही भ्रम नव्हता. डॉ. सिंग रुग्णालयात असताना अण्वस्त्राचे बटन कोणाकडे आहे याची आम्हाला माहिती होती व यासंदर्भात सर्वकाही स्पष्ट होते.
भारताने मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर आजवर जो शांतीपूर्ण कूटनीतिक मार्ग अवलंबला त्यामुळे अतिरेकी शिबिरांविरुद्ध कारवाई करण्याची प्रेरणा मिळाली आहे. तसेच देशातील राजकीय नेतृत्वाद्वारे निर्धारित कार्ययोजनांना पूर्ण करण्यास लष्कर पूर्णत: सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments: