Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 8 February 2009

धवलक्रांतीसाठी खास धोरण हवे : कलाम

डेअरी संघटनेच्या परिषदेचा शानदार शुभारंभ
पणजी, दि. ७ (प्रतिनिधी): दूध उत्पादनातील धवल क्रांती साधण्यासाठी भारताला सर्वंकष दूध धोरण आखण्याची सर्वार्थाने गरज निर्माण झाल्याचे प्रतिपादन माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी आज येथे केले.
३७ व्या भारतीय डेअरी संघटनेच्या (पश्चिम विभाग) तीन दिवसीय परिषदेचे कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री दिगंबर कामत, गृहमंत्री रवी नाईक, सभापती प्रतापसिंह राणे, राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाच्या अध्यक्ष अमृता पटेल, संघटनेचे अध्यक्ष एन. आर. मसीन व पश्चिम विभाग अध्यक्ष अरुण पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
देशाचे दूधविषयक धोरण आखताना त्यात गुरांसंबंधी कृत्रिम गर्भधारणा, त्यांचा आहार, आरोग्य, दूध गोळा करुन त्याची वाहतूक करणे या बाबींचा विचार व्हायला हवा. राष्ट्रीय पातळीवर गुरांच्या कृत्रिम गर्भधारणेविषयीचे धोरणही आखणे आवश्यक असून देशपातळीवर अशी ३० हजारांवर केंद्रे स्थापन करणे गरजेचे आहे. त्यासाठी सार्वजनिक, खासगी तसेच सरकारी सहकार्याची अपेक्षा आहे असेही ते म्हणाले.
इतर देशांच्या तुलनेत भारतीय शेतकऱ्यांना दुधासाठी कमी भाव मिळतो. त्यामुळे त्यांना प्रोत्साहीत केल्यासच धवलक्रांती साध्य करणे शक्य असून त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणे व पशुखाद्य परवडेल अशा दरात उपलब्ध करणे आवश्यक आहे. पडीक जमिनी व इतर चाऱ्याच्या जमिनींचा उचित वापर केल्यास ते शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
दूध उत्पादन वाढवायचे असेल तर गुरांची काळजी वाहाणे गरजेचे ठरते असे सांगून दूधाची जमवाजमव व त्याच्या वाहतुकीचे काम हे स्थानिक दुग्ध सोसायट्यांमार्फत व्हायला हवे असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रक्रीया करण्याच्या प्रमाणातही वाढ होणे गरजेचे असून लघुकाळासाठी १५ तर दिर्घकाळासाठी ही वाढ ३० टक्क्यांवर गेली पाहिजे असे डॉ. कलाम म्हणाले.
आंतरराष्ट्रीय पातळीवर दूध निर्यातीत भारताचे योगदान हे अत्यल्प आहे. त्यात १५ ते २० टक्क्यांनी वाढ करण्याची गरज असून शेतकऱ्यांना त्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे असे ते म्हणाले. कच्या दूधाचा दर्जा, पुरवठ्यात सातत्., पॅकेजिंग पद्धती या गोष्टींवरही भर द्यायला हवा, असे त्यांनी सांगितले.
डेअरी निर्यातीला उत्तेजन देण्याकरिता निर्यात धोरण आखणे, डेअरी व्यवस्थापन पद्धतीची स्थापना व अंमल तसेच दरांबाबतचे उत्पादनातील वैविध्यपूर्ण धोरण आखण्याकडे लक्ष द्यायला हवे, असेही डॉ. कलाम यांनी सांगितले. जागतिक मागणीच्या किमान ५ टक्के तरी निर्यात करणे हा हेतू ठेवून ग्रामीण भागात २० लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशा पद्धतीने भारतीय डेअरी संघटनेने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. येणाऱ्या काळात या उद्योगाच्या भरभराटीसाठी संघटना पावले उचलेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात मुख्यमंत्री कामत यांनी ही परिषद डेअरी व्यवसायात भारताला स्वसंसिद्ध करण्यावर भर देईल, असे सांगून दुग्ध व्यवसायाच्या विकासासाठी गोव्याकरिता विशेष योजना आखण्याचे आवाहन त्यांनी भारतीय डेअरी विकास मंडळाला केले.
या उद्घाटन समारंभात डॉ. टी. के. व्हेली व डॉ. के. जी. उपाध्याय यांना डॉ. कलाम यांच्या हस्ते फेलोशिप प्रदान करण्यात आली. तसेच तंत्रज्ञानातील खास कामगिरीसाठी विशाल मार्केटिंगचे बी. एन. दास यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. कलाम यांच्या हस्ते यावेळी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
योग्य साधनसुविधा उपलब्ध केल्यास भारतीय शेतकरी जागतिक स्पर्धेत मागे पडणार नाहीत, असा विश्वास सभापती प्रतापसिंह राणे यांनी व्यक्त केला. दुग्ध व्यवसायाचा विकास साधण्यास दुग्ध उत्पादकांचे हित सांभाळणे गरजेचे आहे. भविष्यात घरगुती दुग्ध उत्पादनावरच हा विकास अवलंबून असेल, असे सांगून डॉ. अमृता पटेल यांनी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना या व्यवसायाकडे वळण्यास उद्युक्त करण्याची गरज प्रतिपादली. राज्य सरकारांनी गाईगुरांच्या कृत्रिम गर्भधारणेसाठी कालबाह्य कार्यक्रम निश्चित करायला हवा, असे सांगून सरकारच्या सहकार्याने व्यावसायिक पद्धतीने हे काम पुढे नेण्यात येईल. असे आश्वासन त्यांनी दिले. पशुखाद्य नियंत्रण प्राधिकरण स्थापन करण्यावरही राज्य सरकारांनी विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एन. आर. भसीन यांनी, या व्यवसायात १ कोटी ६० लाख कुटुंबे असून मूलभूत सोयीसुविधांचा अभाव ही आज या व्यवसायासमोरील खरी अडचण असल्याचे सांगितले. संपर्क यंत्रणा दर्जामागील अडसर ठरली असून जागतिक आर्थिक मंदीनेही या व्यवसायाला ग्रासल्याचे त्यांनी सांगितले. युरोपीय देशांनी दुग्ध उद्योगाला अनुदान जाहीर केले असून भारतानेही ते जाहीर करायला हवे असे ते म्हणाले.
अरुण पाटील यांनी स्वागतपर भाषण केले. ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संघटनेचे सचिव के. शेजू सिद्धार्थन यांनी आभार मानले.
दुग्ध व्यवसायात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पाच दुग्ध व्यावसायिकांना यंदापासून पुरस्कार देण्याची घोषणा एन. आर. मसीन यांनी यावेळी केली.

No comments: