संतप्त रेती व्यावसायिकांचा दणका
मोरजी, दि. ११ (वार्ताहर)- किरणपाणी आरोंदा येथील होड्या जप्त करून पाच जणांना अटक केल्याप्रकरणी तीव्र पडसाद उमटले असून सावंतवाडी मामलेदार व महसूल विभागाच्या या कारवाईचा निषेध करण्यासाठी रेती व्यावसायिकांनी किरणपाणी आरोंदा फेरी सेवा दुपारी १२.३० ते २ पर्यंत रोखून धरली.
रेती व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष कुस्तान कोएल्हो, प्रकाश कांबळी, विठ्ठल जल्मी, संजय तारी आदी व्यावसायिकांनी संगीता परब यांच्यासमोर आपली कैफियत मांडली. यावेळी संगीत परब यांच्यासह रेती व्यावसायिक संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, रेती कामगार, ट्रक चालक आदी ३०० लोकांच्या जमावाने किरणपाणी आरोंदा धक्क्याशेजारी सभा घेऊन सावंतवाडी मामलेदार, पोलिस आणि महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचा निषेध केला. संगीता परब यांच्या नेतृत्वाखाली जमावाने पेडणे पोलिस स्थानकाचे निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांची भेट घेऊन या घटनेची माहिती दिली असता सदर प्रकरण सागरी पोलिसांच्या अखत्यारीत येत असल्याने शिवोली किनारी पोलिसांना लेखी निवेदन सादर करण्याची सूचना त्यांनी दिली.
दरम्यान, रेती व्यावसायिक संघटनेने आपल्या वकिलांशी बातचीत करून किनारी पोलिसांकडे सुरक्षा पुरवण्याची मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी किरणपाणी येथे रेती काढणाऱ्या एकूण १६ होड्या सावंतवाडी मामलेदार व महसूल खात्याने जप्त केल्या होत्या. यावेळी अध्यक्ष कुस्तान कोएल्हो व उदय पालयेकर यांच्यासह पाच जणांना अटक करून दंडादाखल १.५८ हजार वसून केले होते.
गेली अनेक वर्षे हे व्यावसायिक तेरेखोल खाडीत रेती व्यवसाय करत असून त्यांच्या संघटनेची कायदेशीर नोंद आहे. या संघटनेकडून राज्य सरकारच्या संबंधित खात्यात शुल्क भरणा केला जातो. यामुळे संबंधित खात्याने रेती व्यावसायिकांची समस्या जाणून त्यांना संरक्षण देताना तेरेखोल खाडीत हद्द निश्चित करणे आवश्यक असल्याचे रेती व्यावसायिकांच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले आहे.
Thursday, 12 February 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment