Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 14 February 2009

आरोपी पंढेर आणि कोलीला फाशी

नवी दिल्ली, दि. १३ - संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या निठारी हत्याकांडातील पहिला निकाल आज आला. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आरोपी मोनिंदर सिंग पंढेर आणि त्याचा नोकर सुरिंदर कोली या दोघांनाही रिम्पा हलधर बलात्कार आणि खून प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली.
सीबीआयच्या विशेष न्यायाधीश रमा जैन यांनी काल ५५ वर्षीय पंढेर आणि ३८ वर्षीय कोली यांच्यावर रिम्पा हलधर बलात्कार व खून प्रकरणी आरोप निश्चित केले होते. आज यातील शिक्षेची सुनावणी होणार असल्याने न्यायालयाच्या परिसरात प्रचंड गर्दी झाली होती. रिम्पा या १४ वर्षीय मुलीवर अमानूष बलात्कार करून तिचे तुकडे-तुकडे करणाऱ्या पंढेर आणि कोली यांचा गुन्हा अतिशय गंभीर असल्याचे सांगून त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
पीडित रिम्पासह अनेक बेपत्ता मुलांचे पालक या निवाड्याने समाधानी दिसले. यापूर्वी सीबीआयने पंढेरला आपल्या चौकशीत "क्लीन चिट' दिली होती. आता न्यायालयाने त्याला दोषी ठरविणे ही सीबीआयला मोठी चपराक असल्याचे रिम्पाच्या वकिलांनी म्हटले आहे. तिच्या वतीने ऍड. खालिद खान यांनी काम पाहिले.
पंढेर कुटुंबीय संतप्त
सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिलेल्या निवाड्यावर पीडित रिम्पा हलधरचे कुटुंबीय एकीकडे समाधानी असताना दुसरीकडे पंढेरचे कुटुंबीय प्रचंड संतापले होते. त्याचा मुलगा करण पंढेर याने हा निर्णय अयोग्य असल्याचे सांगून आपले पिता निरपराध असल्याचे म्हटले आहे. या निर्णयाविरुद्ध आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्याने म्हटले.

No comments: