मडगाव, दि. ७ (प्रतिनिधी) : रावणफोंड -केपे- नावेली रस्त्याच्या संगमावरील वाहतुकीस अडथळा ठरणारी १२ घरे व दुकाने आज पोलिस बंदोबस्तात उपजिल्हाधिकारी जॉन्सन यांनी हटविली. त्यासाठी तीन जेसीबी यंत्रांचा वापर करण्यात आला. त्या घरातील रहिवासी व दुकानदारांनी या मोहीमेत संपूर्ण सहकार्य केले. रस्ता रुंदीकरणासाठी या लोकांना कोकण रेल्वे स्टेशनसमोरील जागेत एकूण ५ हजार चौरस मीटर जमीन दिली असून तेथे त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.
रावणफोंड ते नावेलीपर्यंत १५ मीटर रुंदीचा रस्ता बनवण्यासाठी या घरांचा अडसर होत होता. कित्येकांनी तेथे एकाच घरात तीन दुकाने थाटली होती व त्यांनाही सरकारने जमिनी दिल्या आहेत. बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांनी ही घरे काढण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न चालविले व अखेर त्यांच्या पुनर्रवसनाची जबाबदारी घेऊन आधी त्यांना जागा दिली व आता ती हटविली.
कित्येकानी रस्त्यालगत येत असलेले अर्धेअधिक भाग मोडून टाकले आहेत. आज सुटीचा दिवस असल्याने सकाळपासून सायंकाळ पर्यंत पोलिस संरक्षणात हे काम चालु होते. उपजिल्हाधिकारी जॉनसन बरोबर संयुक्त मामलेदार गावकर, पोलिस अधिकारी उपस्थित होते व त्यांच्या दिमतीस बांधकाम खात्याचे ट्रक व बुल्डोझर होते.
या जागेतील ९० टक्के लोक बिगर गोमंतकीय असून त्याना आके बायश येथील कृषी जमिनीतील पिके काढणारी शेतजमिन दिलेली आहे त्यामुळे शेतकरी नाराज बनले असून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. कित्येक घरांना आगाऊ नोटीस न देता ती मोडण्यात आल्याची तक्रार भाजप युवा मोर्चाचे नेते शर्मद पै रायतूकर यांनी केली आहे.
Sunday, 8 February 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment