Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 14 February 2009

कॉंग्रेस कार्यकारिणीवर डावलले; क्षत्रिय मराठ्यांत संतापाची लाट

पणजी, दि. १३ (प्रतिनिधी) - नव्या प्रदेश कॉंग्रेस कार्यकारिणीवर क्षत्रिय मराठा समाजाच्या एकाही व्यक्तीला स्थान दिले गेले नसल्याने एकूण लोकसंख्येच्या वीस टक्के असलेल्या या समाजाच्या नेत्यांनी कॉंग्रेसशी फारकत घेऊन नव्या पक्षाकडे जाण्याचा विचार चालवला असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाची भव्य वास्तू पर्वरीत साकारत असून त्याबाबत जनजागृती करून निधी संकलनासाठी गावोगावी मेळावे घेतले जातात. त्यावेळी या विषयावर चर्चा होत नसली तरी उपस्थित मंडळींत या विषयावरून असंतोष व्यक्त केला जात आहे. समाज संस्थेच्या अध्यक्षपदी असलेले संतोबा देसाई हे भाजपमध्ये असल्याने या समाजाला भाजप जवळचा वाटू शकेल किंवा आजपर्यंत कधीही उघडपणे राजकीय भूमिका न घेणाऱ्या या समाजाने मुभा दिल्यास कॉंग्रेसऐवजी या समाजाचे लोक राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेही जाऊ शकतील असे या मेळाव्याच्या वेळी चर्चा करणाऱ्यांचा अंदाज घेता कळून येते.
गोव्यात क्षत्रिय मराठा व वैश्य यांची संख्या सुमारे २६ टक्के भरते. गेल्या कार्यकारिणीत या समाजाचे देव प्रतिनिधी होते. मात्र, यावेळी त्यांना पूर्णपणे बाजूला ठेवण्यात आले आहे. ख्रिस्ती व मुस्लिम अवघे ३५ टक्के असताना त्यांच्यासाठी ५ जागा, इतर मागासवर्गीयांची संख्या २८ टक्के असताना त्यांच्यासाठी पाच जागा देण्यात आल्या आङेत. दीड ते दोन टक्के असलेल्या सारस्वतांसाठीही दोन पदे दिली आहेत.
कार्यकारिणीत अजिबात बदल केला जाणार नाही, अशी ताठर भूमिका प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी घेतल्यामुळे संतुष्ट क्षत्रिय मराठा समाज येत्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसपासून दूर जाईल, अशी एकंदर चिन्हे दिसत आहेत. कार्यकारिणीवरील मंडळींचे चेहरे पाहता ख्रिस्ती, भंडारी, खारवी एवढेच समाज गोव्यात आहेत, अशी प्रदेशाध्यक्षांची भावना झाल्याचे दिसून येते. आजवर सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न झाला असताना ठरावीक जातींना बाजूला ठेवण्याची हे प्रयत्न कॉंग्रेसला भविष्यात मारक ठरतील, असा सूर क्षत्रिय मराठा समाजात व्यक्त होत आहे.

No comments: