Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 12 February 2009

पार्सेत बांध फुटला; ७०० शेतकरी संकटात

वायंगणी शेती पाण्याखाली; कॉंक्रीटची भिंत बांधण्याची मागणी
मोरजी, दि. ११ (वार्ताहर)- पार्से खाजन गुंडो शेताजवळील मानशीची दारे आज (बुधवारी) दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास कोसळून नदीचे खारे पाणी वायंगणी शेतात घुसल्याने शेतकऱ्यांची लाखो रुपयांची हानी झाली आहे. या शेतावर सुमारे ७०० शेतकरी अवलंबून असून तेथे ७० खंडी भात तसेच हळसांदे, मिरच्या आदींची लागवड केली जाते.
बंधाऱ्यांची जीर्ण झालेली दारे कोसळल्याने वायंगण शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. या घटनेची माहिती मिळताच पेडण्याचे उपजिल्हाधिकारी राजेंद्र मिरजकर यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी सरपंच श्रीराम साळगावकर, उपसरपंच ज्योती पाळणी, पेडणे उपनिरीक्षक उत्तम राऊत देसाई उपस्थित होते.
येथील शेतकरी पुंडलिक कांबळी, यशवंत गोवेकर, राजाराम गोवेकर, गजानन नाईक व अनंत पेटकर आदी शेतकऱ्यांनी या ठिकाणी कायमस्वरूपी कॉंक्रिटची भिंत बांधण्याची मागणी केली. या शेतात विविध पिकांची लावणी करण्यात आली होती. तथापि, बांध फुटल्याने शेतकऱ्यांच्या परिश्रमांवर खऱ्या अर्थाने पाणी फेरले गेले आहे.
मिरजकर यांनी सांगितले की, याबाबात अजून शेतकरी संघटनेने आपल्याशी संपर्क साधला नसून भरपाईची मागणी किंवा निवेदन दिल्यानंतर पुढील सोपस्कार पूर्ण केले जातील.
यासंदर्भात आमदार दयानंद सोपटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मानशीची दारे जीर्ण झाल्याने त्यांची दुरुस्ती करण्याचे काम सुरू होते. परंतु, पाण्याची पातळी अचानकपणे वाढल्याने दारे कोसळली. आज सकाळीच या बंधाऱ्याची पाहणी करून युद्ध पातळीवर काम करण्याची सूचना दिल्याची माहिती त्यांनी दिली. बंधाऱ्यावर घालण्यासाठी नवीन दारे आणायला आपण बांदा येथे गेलो असता ही घटना घडली. शेतकऱ्यांना सरकारकडून भरपाई मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.
दरम्यान, दरवर्षी हा बांध कोसळून शापोरा नदीचे पाणी शेतत घुसत असल्याने काही शेतकऱ्यांनी आपली जमीन पडीक ठेवली होती. यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणात पाणी घुसले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

No comments: