Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 9 February 2009

बांडोळी "शिकार'प्रकरणी खुनाच्या गुन्ह्याची नोंद

एकाला अटक, दुसरा फरारी
सावर्डे व कुडचडे, दि. ८ (प्रतिनिधी) : डोंगराळ भागात काल रात्री सुमारे ८.३० वाजता शिकारीला गेले असता सावज समजून गोळी लागल्याने तेम बांडोळी येथील मोहन गोपी गावकर (२२) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला; तर नंदा नाईक हा फरारी असून विश्वनाथ आत्मा गावकर याला अटक करण्यात आली आहे.
तेम बांडोळी किर्लपाल दाभाळ येथील डोंगराळ भागात काल रात्री घडलेल्या या घटनेत वापरलेली १२ बोअरची बंदूक, हेडलाईट व चपला घटनास्थळी सापडल्या असून विश्वनाथ आत्मा गावकर याला वैद्यकीय चाचणीसाठी बांबोळीतील गोमेकॉ इस्पितळात नेण्यात आले आहे.
कुडचडे पोलिस स्थानकाचा ताबा घेतलेले सांग्याचे पोलिस निरीक्षक राजू राऊत देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार विश्वनाथ व मृत मोहन गावकर हे चुलतभाऊ आहेत. त्यांनी यापूर्वी अनेकदा शिकारीला जाण्याचा बेत केला होता. तथापि, नंदा नाईक हा काही तास अगोदरच शिकारीला येऊन नंदा नाईक ठरल्या स्थळी जाऊन बसला होता. याची चाहूल मात्र मोहन गावकर व विश्वनाथ गावकर यांना नसल्याने ते दोघे काही तासाने शिकारीला गेले होते. तसेच त्यांच्याकडे दोन बंदुका होत्या. यावेळी सावज असल्याचा समज होऊन नंदा नाईकने बंदुकीची गोळी झाडली असता ती थेट मोहन गावकर यांच्या तोंडाला व काळजाला जाऊन भिडल्याने तो जागीच गतप्राण झाला. मग दोघांनी मिळून मोहनला उचलून डोंगराळ भागातून गावात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंतर फारच दूर असल्यामुळे ते वाटेतच थांबले. विश्वनाथ गावकर याने याची माहिती गावात येऊन इतरांना दिली. मात्र ही संधी साधून नंदा नाईक याने तेथून पलायन केले.
आज सकाळी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता शिकारीची बंदूक हेडलाईट व इतर सामान मिळाले.
गोळी झाडलेली बंदूक गायब
घटनास्थळी ताब्यात घेतलेल्या बंदुकीतून गोळी झाडण्यात आलेली नसून बंदुकीत गोळी तशीच भरलेल्या स्थितीत आहे. यामुळेच दुसऱ्या बंदुकीतून गोळी झाडण्यात आली असावी व
नंदा याने त्या बंदुकीसह पलायन केल्याचा निष्कर्ष पोलिसांकडून काढण्यात आला आहे.
पोलिसांनी याप्रकरणी खुनासह अन्य विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. उद्या संध्याकाळपर्यंत या प्रकरणाचा छडा लावला जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

No comments: