Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 11 February 2009

पं. भीमसेन जोशी यांना 'भारत रत्न' प्रदान

पुणे, दि. १० : आपल्या पहाडी आवाजाने गेली साठ वर्षे प्रभावित करणारे सुप्रसिद्ध गायक पंडित भीमसेन जोशी यांना आज दुपारी बारा वाजता त्यांच्या कलाश्री या राहत्या घरी "भारत रत्न' हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय सहसचिव जे. ई. अहमद यांनी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान केला. यावेळी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील, विभागीय आयुक्त दिलीप बंड व जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी हे उपस्थित होते.
प. भीमसेन जोशी यांची प्रकृती वृद्धापकाळामुळे तेवढीशी बरी नाही, त्यामुळे हा सन्मान अतिशय साध्या वातावरणात प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात श्रीमती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते व्हावा, अशी मूळची योजना होती. पंडितजींची प्रकृती लक्षात घेता त्यांना पुण्याहून दिल्लीला विशेष विमानाने नेण्याचीही तयारी करण्यात आली होती. पण त्यांची प्रकृती अशक्त असल्याने तोही निर्णय बदलण्यात आला व पुण्यातही मोठा कार्यक्रम करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्याखेरीज पंडितजींचे कुटुंबीय व शिष्यवर्ग उपस्थित होते. तेथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही प्रवेश दिला नव्हता.
पं. भीमसेन जोशी यांनी राष्ट्रपती व मंत्रिमंडळाचे आभार मानले. पंडितजींच्या प्रकृतीतील अशक्तपणा कार्यक्रमात जाणवत होता, तरीही ते प्रसन्न दिसत होते. नंतर पत्रकारांशी बोलताना राज्यसरकारचे मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, राज्यशासनाने पंडितजींच्या नावाने दोन मोठ्या शिष्यवृत्त्या जाहीर करण्याचे ठरविले आहे.
भीमसेन जोशी यांच्या पुण्यातील नवीपेठ भागातील "कला श्री' या निवासस्थानी आज सकाळपासून मोठ्या समारंभाचे स्वरूप आले होते. सर्वत्र रांगोळीच्या पायघड्या व रोशणाई करण्यात आली होती.

No comments: