Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 13 February 2009

हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये लवकरच धूम्रपानबंदी

"नोट'च्या मागण्या
"शॅक्स'ना परवानगी देताना धूम्रपानविरोधी नियम लागू करावे.
हॉटेल परवानाच्या नूतनीकरणप्रसंगीत्यांनाही अटी घालाव्यात.
किनारे आणि उद्याने धूम्रपानमुक्त म्हणून घोषित करावीत.
हॉटेल्सना दंडाची रक्कम २०० वरून ५ हजार रुपये करावी.

"नोट'च्या कार्यक्रमात विस्तृत विचारमंथन


पणजी, दि. १२ (प्रतिनिधी) - पोलिसांनी कोणाचीही तमा न बाळगता सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान किंवा थुंकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. गोव्यात सार्वजनिक ठिकाणी तसेच हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये धूम्रपान करण्यास बंदी असल्याची अधिसूचना येत्या आठ दिवसांत काढली जाईल, असे राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी "नोट'च्या कार्यक्रमात जाहीर केले. "तंबाखूविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीत युवकांचा सहभाग' या विषयावर आयोजिलेल्या शिबिरात श्री. राणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पोलिस महासंचालक बी एस. ब्रार, "व्हॉईस नवी दिल्ली' या संस्थेचे अध्यक्ष बिजोन मिश्रा, आरोग्य संचालिका डॉ. राजनंदा देसाई, उत्तर गोवा पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज, "नोट'चे सचिव डॉ. शेखर साळकर, "एनएसएस'चे श्री. वाझ व दोरंग सिन्हा उपस्थित होते.
इयत्ता नववी व दहावीत शिकणारे काही विद्यार्थी धूम्रपान करीत असल्याच्या तक्रारी येथे असून गोव्यातील विद्यार्थी संघटनांनी हा विषय व्यवस्थित हाताळण्याची गरज असल्याचे यावेळी श्री. राणे म्हणाले.
धूम्रपानाच्या विरोधात सर्व जनतेला जागृत केले पाहिजे. धूम्रपानविरोधी कारवाई ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून कोणताही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करताना आढळल्यास त्यास विरोध केला पाहिजे. जनतेच्या सहकार्याविना पोलिस यशस्वी होत नाहीत. तंबाखूचे उत्पादन बंद केल्यास देशातील १५ लाख शेतकरी अडचणीत येतील हा युक्तिवाद पळपुटा असून त्या शेतकऱ्यांना अन्य पिकांच्या लागवडीसाठी प्रोत्साहित करावे, असे ब्रार म्हणाले.
वर्षाला शंभर दशलक्ष लोक केवळ धूम्रपानामुळे मृत्युमुखी पडत आहेत. विकसनशील देशांत ही संख्या मोठी आहे. तंबाखू किती हानिकारक आहे, याची जाणीव जनावरांनाही आहे. कोणतेच जनावर जंगलात तंबाखूची पाने खात नाही, अशी माहिती यावेळी डॉ. शेखर साळकर यांनी आपल्या "पॉवर पॉइंट'द्वारे सादरीकरण करताना दिली. १ लाख ३० हजार टन दर वर्षी तंबाखूचे उत्पादन केले जाते. दरवर्षी देशात कर्करोगाचे ८ लाख नवे रुग्ण आढळतात. यातील ३ लाख रुग्णांना धूम्रपानामुळे कर्करोग झालेला असतो, असे ते म्हणाले. चित्रपटातील "किंग खान' हा सतत धूम्रपान करीत असतो तर, क्रिकेटमधील "किंग' सचिन तेंडुलकरला कोणतेही व्यसन नाही. त्यामुळे कोणता "किंग' आपल्याला हवा ते तुम्हीच ठरवा. "तुमचा प्रियकर धूम्रपान करीत असल्यास या "व्हॅलेंटाइन डे'ला त्याच्याकडून धूम्रपान करणे सोडायचे "गिफ्ट' घ्या, असा सल्लाही डॉ. साळकर यांनी दिला.
सिगरेट किंवा गुटखावर बंदी टाकू नये यासाठी निवडणुकीच्या काळात तंबाखूचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या राजकीय पक्षांना पैशांची मदत करतात. त्यामुळे यावेळी तंबाखू कंपन्यांकडून पैसे घेणाऱ्या राजकीय पक्षांना मतदान करू नये, असे यावेळी बीजोन मिश्रा म्हणाले. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या विरोधात दाखल केलेला खटला मुंबई उच्च न्यायालयात हरल्यास सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाणार असल्याचे यावेळी श्री. मिश्रा म्हणाले.
धूम्रपान विरोधी जागृती करण्यासाठी आणि प्रत्येक हॉटेलात जाऊन पाहणी करण्यासाठी "एनएसएस' च्या विद्यार्थ्यांनी योगदान दिल्याबद्दल त्यांनाही यावेळी प्रमाणपत्र देण्यात आले. "नोट'ने आयोजिलेल्या भिंत्तीपत्र स्पर्धेत म्हापसा येथील सेंट. झेवियर महाविद्यालयाला प्रथम पारितोषिक मिळाले. द्वितीय पारितोषिक डॉन बॉस्को महाविद्यालय पणजी यांना, तर तिसरे दामोदर महाविद्यालय मडगाव व कार्मेल महाविद्यालय नुवे यांनी विभागून मिळाल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

No comments: