Wednesday, 6 April 2011
मातृभाषा, संस्कृती रक्षणास्तव आज पणजीत शक्तिप्रदर्शन
दुपारी जाहीर सभेचे आयोजन
पणजी, दि. ५ (प्रतिनिधी)
शिक्षणमंत्र्यांसह कॉंग्रेस मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी आणि डायसोसन सोसायटीने पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक स्तरावर इंग्रजी माध्यम करून गोव्याची संस्कृती आणि मातृभाषा संपवण्याचा जो घाट घातला आहे त्याच्या विरोधात उद्या गोव्यातील स्वाभिमानी जनता मैदानात उतरणार असून उद्या दि. ६ रोजी पणजीतील आझाद मैदानावर होणार्या जाहीर सभेत शक्तिप्रदर्शन करण्याचा निर्धार मराठी व कोकणी भाषाप्रेमींनी केला आहे.
उद्या दुपारी ३ वाजता ही सभा सुरू होणार आहे. मराठी आणि कोकणी भाषाप्रेमींनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या अध्यक्षा तथा माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांनी उद्याच्या या शक्तिप्रदर्शनात स्वाभिमानी पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याची हाक दिली आहे.
ही सभा यशस्वी करण्यासाठी गेल्या आठवड्यापासून जोरदार तयारी सुरू आहे. त्या संदर्भात ८० ठिकाणी बैठका घेण्यात आलेल्या आहेत. तसेच, प्रत्यक्ष साडेतीन हजार लोकांशी संपर्क साधण्यात आला आहे. या साडेतीन हजार लोकांच्या माध्यमातून उद्या होणार्या सभेत किमान २५ हजार पालक सहभागी होतील, अशी अपेक्षा असल्याचे श्रीमती काकोडकर यांनी बोलून दाखवले.
------
आता इंग्रजीवाल्यांचेही आंदोलन
कॉंग्रेस आघाडीतील ख्रिस्ती मंत्री व आमदारांनी प्राथमिक माध्यम इंग्रजी करण्यासाठी सरकारवर दबाव टाकण्याचा केलेला प्रयत्न व्यर्थ गेल्याने आता त्यांनी भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या आंदोलनाला सडेतोड उत्तर देण्यासाठी समांतर आंदोलन छेडण्याचा विचार चालवला आहे. आज विधानसभा संकुलात सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांच्या दालनात झालेल्या बैठकीत याप्रकरणी खलबते झाल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. उद्या ६ रोजी भारतीय भाषा सुरक्षा मंचाने बोलावलेल्या जाहीर सभेचा बराच धसका या नेत्यांनी घेतला आहे. भारतीय भाषा सुरक्षा मंचाप्रमाणेच इंग्रजीच्या सक्तीसाठी गावागावांत सभा व बैठका घेण्याची व्यूहरचना त्यांनी आखली असल्याचे समजते. या आंदोलनात सर्व ख्रिस्ती मंत्री व आमदारांना एकत्र करून आपला स्वतंत्र दबाव गट तयार करण्याचा त्यांचा विचार सुरू असून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासाठी ही नवी डोकेदुखी ठरण्याचीच अधिक शक्यता आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment