‘आयपीएल’चा थरार आजपासून
‘आयपीएल’ अर्थात, इंडियन प्रीमियर लीगचे चौथे पर्व आजपासून सुरू होत आहे. या आयपीएलमध्ये विश्वचषक विजेते भारतीय खेळाडू एकमेकांविरुद्ध त्वेषाने खेळत असल्याचे थरारक चित्र दिसणार आहे. यावेळी मात्र ते प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावत जल्लोषात खेळतील. देशासाठी संघभावना ठेवून प्रत्येकाला सांभाळून खेळणारे भारतीय खेळाडू आता त्यांच्याचविरुद्ध अत्युच्च क्रिकेट खेळण्यासाठी लढणार आहेत. त्याचप्रमाणे विश्वचषकात संधी न मिळालेले खेळाडू आम्हीही या संघासाठी लायक होतो, हे सिद्ध करण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.
चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, रविचंद्रन आश्विन या आपल्या संघसाथींबरोबर मायकेल हसी, ड्वेन ब्राव्हो, नुवान कुलशेखरा, सूरज रणदीव, टीम साऊथी या विदेशी खेळाडूंना साथीला घेऊन सचिन तेंडुलकर, युवराज सिंग यांच्या संघांना हरवण्यासाठी खेळणार आहे. विश्वचषक जिंकल्यानंतर वानखेडेवर सचिन तेंडुलकरला खांद्यावरून मिरवणारा युसुफ पठाण यावेळी त्याच सचिनला परास्त करावे यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे सचिन, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर आदी भारतीय फलंदाज गोलंदाजीत उपयुक्त योगदान दिलेल्या मालिकावीर युवराजची गोलंदाजी फोडून काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत.
झहीर खानचे चेंडू स्टेडियमबाहेर टोलवण्यासाठी पठाण, रैना, धोनी आदी फलंदाज जोरदार प्रयत्न करणार आहेत. विश्वचषकात विदेशी खेळाडूंना टिपणारा झहीर यावेळी आपल्याच संघसहकार्यांना तंबूत पाठवण्यासाठी कमालीचा उतावीळ झालेला असेल.
आशिष नेहराही काही सामन्यांनंतर आपल्या संघसाथींच्या विरोधात उभा ठाकणार आहे. मुनाफ पटेल, पीयूष चावला, पठाण, श्रीशांत आदी गोलंदाज आपल्या संघसाथींना भेदक मारा करून ‘हम भी कुछ कम नही’ हेच दाखवायचा प्रयत्न करतील.
दरम्यान, समस्त भारतीय व विदेशी क्रिकेटरसिक आपलेच खेळाडू एकमेकांविरोधात कसे खेळतात हे अनुभवण्यासाठी सज्ज झाले आहेत. कुमार संगकारा विश्वचषकातील तो पराभव विसरून भारतीय खेळाडूंच्या जोरावर ‘आयपीएल’चे विजेतेपद मिळावे यासाठी प्रयत्न करणार आहे. कालपर्यंत संगकाराचा संघ हरू दे अशी करुणा भाकणारेे कर्नाटकी प्रेक्षक त्याच्याच विजयासाठी प्रार्थना करणार आहेत. मुंबईखेरीज अन्य भागांतील प्रेक्षक
तेंडुलकरचा संघ पराभूत व्हावा यासाठी प्रार्थना करतील. उत्कृष्ट कर्णधार धोनीच्या मर्यादा स्पष्ट करण्यासाठी त्याचेच संघसाथी त्याच्यावर बाजी उलटवण्यासाठी सज्ज झाले आहेत. गंभीरच्या फलंदाजीतील दोष दाखवण्यासाठी झहीर, भज्जी जोरदार प्रयत्न करणार आहेत. युवीचे साम्राज्य संपवण्यासाठी खुद्द धोनी, सचिन ही दिग्गज मंडळी खास योजना आखतील. झहीरची गोलंदाजी कशी फोडता येते हे दाखविण्यासाठी धोनी - रैना आपल्या बॅटला धार लावण्यात मग्न आहेत. कोहलीला कसे लवकर बाद करता येते हे दाखविण्याचा प्रयत्न भारतीय गोलंदाज करतील. श्रीसंत आपली गोलंदाजी भले महागडी असली तरी तेंडुलकर, सेहवाग, धोनी, गंभीर यांना धडा शिकवण्यासाठी सज्ज झाला आहे.
थोडक्यात सांगायचे तर कालपर्यंत परस्परांना मैदानात मिठ्या मारणारे खेळाडू आजपासून एकमेकांना त्याच मिठीत चिरडून टाकण्याच्या योजना आखू लागले आहेत. म्हणूनच हे सगळे सामने रोमांचकारी ठरणार आहेत. या स्पर्धेतील सर्वांत रोचक भाग आहे तो हाच!
Friday, 8 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment