जन लोकपाल विधेयक अमलात आणण्याची मागणी
देश-विदेशातून भक्कम पाठिंबा
राळेगण सिद्धीतही शेकडो समर्थकांचे उपोषण
नवी दिल्ली, दि. ५
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे आवाहन झुगारून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आजपासून भ्रष्टाचाराविरोधात लढा देण्यासाठी लोकपाल विधेयकाऐवजी जन लोकपाल विधेयक आणण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला प्रारंभ केला. देशभरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी हजारेंच्या आमरण उपोषणाला ‘स्वातंत्र्याचा दुसरा लढा’ अशी उपाधी दिली आहे. दरम्यान, अण्णा हजारे यांच्या उपोषणाला देश-विदेशातून भक्कम पाठिंबा मिळाला असून, देशाच्या विविध भागांत शेकडो सामाजिक कार्यकर्तेही आज हजारेंच्या समर्थनार्थ एक दिवसाच्या उपोषणावर बसले आहेत.
७२ वर्षीय अण्णा हजारे यांनी आधी येथील राजघाटवर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली अर्पण केली आणि त्यानंतर जंतरमंतर येथे उपोषणास प्रारंभ केला. देशातील भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी अत्यावश्यक असलेले जन लोकपाल विधेयक सरकार मंजूर करीत नाही तोपर्यंत आपण उपोषण मागे घेणार नाही, असे हजारे यांनी उपस्थित पत्रकारांना सांगितले. या आंदोलनात माझा जीव गेला तरी चालेल मात्र, मी आपले आंदोलन मागे घेणार नाही, असा ठाम निर्धारही अण्णांनी जाहीर केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश, किरण बेदी आणि मॅगसेसे पुरस्कार विजेते संदीप पांडे, मेधा पाटकर, योगगुरू बाबा रामदेव, श्री श्री रविशंकरजी, अरविंद केजरीवाल, ऍड. प्रशांत भूषण, संतोष हेगडे आदी उपस्थित होते.
जन लोकपाल विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी सरकारने समिती स्थापन करावी आणि या समितीत ५० टक्के शासकीय अधिकारी व उर्वरित सदस्यांमध्ये नागरिक आणि बुद्धिजीवींचा सहभाग असावा, अशी मागणी करतानाच, भ्रष्टाचाराच्या मुद्यावर सरकार आपल्याला इतके का घाबरत आहे, असा सवाल हजारे यांनी केला.
राजघाटवरून हजारे खुल्या जीपमधून इंडिया गेटकडे निघाले. यावेळी असंख्य समर्थक आणि विद्यार्थी हातात तिरंगा ध्वज घेऊन त्यांच्या मागे-पुढे होते. तत्पूर्वी, सोमवारी रात्री पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी हजारे यांना उपोषणावर न बसण्याचे आवाहन करताना, आपल्या मागणीवर सरकार विचार करेल, असे आश्वासन दिले. अण्णांच्या उपोषणाच्या निर्णयावर पंतप्रधानांनी नाराजीही व्यक्त केली. पण, हजारे यांनी आमरण उपोषणाचा आपला निर्धार कायम ठेवला.
पंतप्रधान म्हणतात की, आमचा तुमच्यावर विश्वास आहे, आम्ही तुमचा आदर करतो. मग, पंतप्रधान आमने-सामने बसून आमच्याशी चर्चा का करीत नाहीत, असा सवालही अण्णांनी उपस्थित केला. गेल्या महिन्यातील बैठकीत भ्रष्टाचार हाताळण्यासाठी अधिकारी आणि नागरिकांचा समावेश असलेली संयुक्त समिती स्थापन करण्यास पंतप्रधानांनी नकार दिल्याने आपली निराशा झाली. सरकारने जर स्वत:च हे विधेयक तयार केले तर त्या विधेयकात लोकशाहीचे प्रतिबिंब राहणार नाही, असेही अण्णांनी स्पष्ट केले.
उपोषणाच्या ठिकाणाला भेट देणारे संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनीही हजारेंच्या उपोषणाला पाठिंबा दिला आणि देशातून भ्रष्टाचार हद्दपार करण्यासाठी जन लोकपाल विधेयकाची नितांत गरज असल्याचे सांगितले. या विधेयकाचा जो मसुदा हजारे आणि इतरांनी तयार केलेला आहे, तो आपल्याला मान्य आहे. हा मसुदा संसदेत सादर करण्याची आपली इच्छा आहे, असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना किरण बेदी आणि संदीप पांडे म्हणाले की, येथे उपस्थित सर्वच कार्यकर्ते आज दिवसभर उपोषण करतील. पण, हजारेजींचे उपोषण सरकारकडून त्यांची मागणी मान्य होईपर्यंत सुरूच राहील. देशाच्या सर्वच स्तरावरील नागरिकांनी हजारेंना पाठिंबा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
भ्रष्टाचार्यांसाठी कर्दनकाळ ठरलेले आणि आपल्या शांततापूर्ण आंदोलनाने सरकारला घाम ङ्गोडणारे अण्णा हजारे यांनी आत्तापर्यंत आपल्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत सहा मंत्री आणि ४०० अधिकार्यांना घरी बसविले आहे.
राळेगण सिद्धीत अण्णांचे समर्थक उपोषणावर
हजारे यांनी दिल्लीत आमरण उपोषण सुरू केल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ राळेगण सिद्धीतही त्यांच्या शेकडो समर्थकांनी उपोषण सुरू केले आहे. काल गुढी पाडव्याच्या दिवशी अण्णांच्या या स्वगृही प्रत्येकानेच आपल्या घरी गुढी उभारताना, सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी गुढीवर काळे ङ्गडकेही बांधले.
अनेकांनी टेक्स्ट मॅसेज आणि ई-मेलच्या माध्यमातून अण्णांच्या उपोषणाला आपला पाठिंबा दर्शविला आहे. अनेक जण आपल्या घरी किंवा कार्यालयात उपोषणावर बसले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेश कॉंगे्रसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीही अण्णांना उपोषण पुढे ढकलण्याचे आवाहन केले. पण, अण्णांनी त्यांचेही न ऐकता उपोषण सुरू केले.
Wednesday, 6 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment