स्वेता खांडेपारकर, गुरुदास सावंत, प्रज्योत नाईक विजेते
पणजी, दि.४ (प्रतिनिधी)
क्रिकेटमध्ये यश मिळवण्यासाठी जबर आत्मविश्वास व कठोर मानसिकता यांची गरज असते. भारतीय संघाने याच सूत्रांआधारे विश्वचषक पटकावला व तमाम देशवासीयांना अनमोल अशी सोनेरी भेट दिली, असे प्रतिपादन गोव्याचे अष्टपैलू क्रिकेटपटू शेरबहादूर यादव (शेरु) यांनी आज येथे केले.
‘गोवादूत’तर्फे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनिमित्त ‘गोवादूत’च्या वाचकांसाठी ‘विश्वचषक क्रिकेट धमाका २०११ स्पर्धा’आयोजिली होती. शेरबहादूर यादव यांच्या हस्ते आज ४ एप्रिल रोजी या स्पर्धेचा निकाल ‘गोवादूत’च्या मुख्यालयात काढण्यात आला. यात धमाका ३ -( विश्वविजेता) मध्ये स्वेता खांडेपारकर - ड्रायव्हर हिल, वास्को (बक्षीस १० हजार रुपये ), धमाका २ (अंतिम फेरीतील दोन संघ ) मध्ये गुरुदास कृष्णा सावंत, पेडे म्हापसा (बक्षीस ५ हजार रुपये) व धमाका क्र. १ (उपांत्य फेरीतील चार संघ ) मध्ये प्रज्योत नाईक, नावत बांदोडा (बक्षीस ३ हजार रुपये) यांना बक्षिसे प्राप्त झाली.
‘जीपीएल’मध्ये सर्वांत महागडा खेळाडू ठरलेल्या शेरबहादूर यादव यांनी वरील भाग्यवान विजेत्यांच्या नावांची कुपन्स काढली. या वेळी अभिनव पब्लिकेशन्सच्या संचालक ज्योती धोंड व सागर अग्नी, ‘गोवादूत’चे संपादक गंगाराम म्हांबरे, कार्यकारी संपादक सुनील डोळे, पुरवणी संपादक अशोक नाईक (‘पुष्पाग्रज’), डीटीपी व्यवस्थापक राजू पवार, प्रमुख प्रतिनिधी किशोर नाईक गावकर व ‘गोवादूत’चे कर्मचारी उपस्थित होते. ज्योती धोंड यांनी शेरबहादूर यादव ऊर्फ शेरु यांचे स्वागत केले. सुनील डोळे यांनी पुष्पगुच्छ प्रदान केला. मुख्य उपसंपादक सचिन वेटे यांनी सूत्रनिवेदन केले. उपसंपादक धीरज म्हांबरे यांनी स्पर्धेबद्दल माहिती दिली.
उपांत्य फेरीतील चार संघ कोणते, या धमाका १ च्या प्रश्नाला (रुपये ३ हजार ) प्रचंड प्रतिसाद मिळूनही फक्त दोघा जणांनी चौथा संघ म्हणून न्यूझीलंडचे नाव लिहिले होते. त्यातील एक कुपन काढल्यानंतर प्रज्योत सावंत याला विजयी म्हणून घोषित करण्यात आले. धमाका २ मध्ये अंतिम फेरीतील दोन संघ कोण (रुपये ५ हजार) या प्रश्नाला ३६१ उत्तरे बरोबर होती. यामधे गुरुदास सावंत हे भाग्यवान ठरले तर धमाका ३ (रुपये १० हजार )विश्वचषक विजेता कोण, या प्रश्नाचे ४७५ जणांनी भारत विश्वचषक जिंकणार असे अचूक उत्तर दिले. मात्र या सर्वांत स्वेता खांडेपारकर भाग्यवान ठरली.
या प्रसंगी शेरबहादूर यादव यांनी भारतीय संघाच्या विश्वविजयावर रंगतदार चर्चा केली. गौतम गंभीर आणि विराट कोहली यांची भागीदारी हा विजयाचा ‘टर्निंग पॉइंट’ ठरल्याचे सांगितले. गोवा क्रिकेट असोसिएशनने क्रिकेट खेळाडूंना चांगल्या सुविधा पुरवण्यास सुरुवात केल्यामुळे गोवा संघ चांगले प्रदर्शन करत असल्याचे ‘शेरु’ यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. संपादक गंगाराम म्हांबरे यांनी आभार व्यक्त केले. लवकरच एका कार्यक्रमात वरील तिन्ही विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती संचालक सागर अग्नी यांनी यावेळी दिली.
Tuesday, 5 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment