भाजप शिष्टमंडळाची ‘काबो’वर धडक
पणजी, दि. ४ (प्रतिनिधी)
विधानसभेत विविध प्रकरणांवरून विरोधी भाजपकडून सरकारचे ‘वस्त्रहरण’ सुरू असतानाच आता शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांना मुंबई विमानतळावर विदेशी चलन तस्करीप्रकरणी कस्टम अधिकार्यांकडून ताब्यात घेण्याचा प्रकार म्हणजे विरोधकांच्या हाती आयतेच कोलित ठरला आहे. या प्रकरणांवरून उद्या ५ रोजी विधानसभेत भाजप आक्रमक भूमिका घेऊन स्थगन प्रस्ताव मांडण्याची शक्यता असल्याने सरकारची कोंडी ठरलेली आहे. भाजप शिष्टमंडळाने घेतलेल्या राज्यपालांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी या प्रकरणी बाबूश मोन्सेरात यांच्याकडे खुलासा मागितला आहे. उद्या सभागृहात मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना अधिकृत स्पष्टीकरण देणे भाग पडणार असल्याने ते नेमकी काय भूमिका घेतात याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.
गुन्हेगारी प्रकरणांची पार्श्वभूमी असलेल्या बाबूश मोन्सेरात यांच्या ‘रेकॉर्ड’मध्ये अधिकाधिक गुन्ह्यांची भर पडत आहे. अशा व्यक्तीकडे शिक्षण खाते देऊन सरकार विद्यार्थ्यांसमोर कसला आदर्श ठेवू पाहत आहे? बेहिशेबी विदेशी चलन तस्करीप्रकरणी मुंबई कस्टमच्या कचाट्यात सापडलेल्या बाबूश मोन्सेरात यांच्यामुळे गोव्याची जगभरात बदनामी झाली आहे. त्यामुळे राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्धू यांनी तात्काळ हस्तक्षेप करून बाबूश यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यास मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना भाग पाडावे, अशी जोरदार मागणी आज भाजप शिष्टमंडळाने केली.
भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी १७ सदस्यीय शिष्टमंडळाने राजभवनवर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. शिष्टमंडळात खासदार श्रीपाद नाईक,विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर,आमदार फ्रान्सिस डिसोझा, दामोदर नाईक, दिलीप परूळेकर,अनंत शेेट, दयानंद मांद्रेकर तसेच प्रदेश भाजपचे पदाधिकारी राजेंद्र आर्लेकर, सदानंद तानावडे,सौ. कुंदा चोडणकर, वैदही नाईक आदींचा समावेश होता.. या भेटीनंतर राजभवनसमोर पत्रकारांशी बोलताना प्रा. पार्सेकर म्हणाले, विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारची भ्रष्ट प्रकरणे विधानसभेत रोज उजेडात येत आहेत. राज्यातील कॉंग्रेस आघाडीचे कलंकित सरकार उलथवून या वर्षभरात गोव्याचे हित राखणारे सरकार सत्तेवर आणण्यासाठी भाजप रान उठवणार आहे.
विद्यमान कॉंग्रेस सरकारची कार्यपद्धती व बाबूश यांच्या गुन्हेगारी प्रकरणांची जंत्रीच या शिष्टमंडळाने राज्यपालांसमोर ठेवली. राज्याच्या एका जबाबदार मंत्र्यांना कस्टम अधिकार्यांनी ताब्यात घेऊन तीन दिवस उलटले तरी अद्याप सरकारकडून अधिकृत वक्तव्य केले जात नाही, याला काय म्हणावे, असा सवाल शिष्टमंडळाने केला. आपल्याकडून हे कृत्य अजाणतेपणाने झाल्याचे बाबूश म्हणतात. याचा अर्थ यापूर्वी त्यांनी अशाच पद्धतीने अजाणतेपणाने आणखी किती विदेशी चलनाची तस्करी केली काय याची चौकशी व्हायला हवी, असेही प्रा. पार्सेकर म्हणाले.
विधानसभा अधिवेशन सुरू असताना राज्याबाहेर जाण्यापूर्वी सभापती व मुख्यमंत्र्यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागते. आता या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी सदर परवानगी घेतल्याचे भासवले जात आहे. तथापि, बाबूश यांनी विदेशात जाण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाची परवानगी घेतली होती काय, असाही प्रश्न उपस्थित होतो. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचे मौनव्रत संशयाला आणखी बळकटी देत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी या शिष्टमंडळाने त्यांना केल्याचेही यावेळी सांगण्यात आले. बाबूश यांच्याकडे नेमके किती विदेशी
चलन सापडले याची कस्टमकडूनही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. केंद्रात व महाराष्ट्रातही कॉंग्रेस आघाडीचेच सरकार सत्तेवर आहे व या प्रकरणावर पडदा टाकला जाण्याचीच जास्त शक्यता आहे. हा विषय भाजप सहजासहजी सोडणार नाही. याप्रकरणावर संसदेतही जोरदार आवाज उठवला जाईल, असे खासदार श्रीपाद नाईक म्हणाले.
आज ठरणार व्यूहरचना
बाबूश यांना तात्काळ मंत्रिमंडळातून डच्चू द्यावा या मागणीची पूर्तता झाली नाही तर उद्या ५ रोजी विधानसभेत भाजप विधिमंडळ पक्षाची व्यूहरचना कशी असेल, याचा निर्णय उद्या सकाळी घेण्यात येईल. याप्रकरणी सभागृह व सभागृहाबाहेरही भाजप जोरदार मोर्चेबांधणी करणार असल्याचे संकेत प्रा.पार्सेकर यांनी दिले. राज्यपालांनी शिष्टमंडळाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. या प्रकरणाचे गांभीर्य त्यांनाही उमगले आहे. त्यामुळे ते नेमकी काय भूमिका घेतात त्यानुसार पुढील कृतीची आखणी करू, असे प्रा. पार्सेकर म्हणाले.
भाजपतर्फे आज मोर्चा
शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून डच्चू देण्याच्या मागणीसाठी भाजपने उद्या मंगळवार ५ एप्रिल रोजी पणजीत दुपारी तीन वाजता मोर्चाचे आयोजन केले आहे. हा मोर्चा पणजी शहरांत फिरून त्याचे आझाद मैदानावर विराट जाहीर सभेत रूपांतर होईल. याप्रसंगी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, खासदार श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर व इतर नेते हजर राहणार आहेत. वारंवार विदेश दौरा करीत असलेल्या आमदार व मंत्र्यांची तात्काळ चौकशी व्हावी, अशी मागणी यावेळी केली जाईल. राज्यातील भाजपचे तमाम कार्यकर्ते व स्वाभिमानी नागरिकांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपने केले आहे.
Tuesday, 5 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment