मातृभाषाप्रेमींच्या महामेळाव्यात आवाहन
- इंग्रजी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक शाळांवर बंदी घाला
- इंग्रजी विद्यालयांनाही मातृभाषा बंधनकारक करा
- शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांचा राजीनामा हवाच
पणजी, दि. ६ (प्रतिनिधी)
अराष्ट्रीयीकरण करणार्या इंग्रजी माध्यमाच्या प्ले-स्कूल व पूर्व प्राथमिक शाळांच्या नोंदणीवर बंदी घालावी. तसेच, सुरू असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयांनाही भारतीय भाषेतूनच शिक्षण देणे बंधनकारक करावे, असा एकमुखी ठराव आज घेण्यात आला.भारतीय भाषा आणि संस्कृतीच्या संरक्षणासाठी आज आझाद मैदानावर संपूर्ण गोव्यातून जनसागर लोटला होता. यावेळी हजारोंच्या संख्येने जमलेल्या राष्ट्रीय विचारसरणीच्या लोकांनी शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या राजीनाम्याची मागणी करून तसा ठरावही घेतला.
भारतीय भाषा सुरक्षा मंचातर्फे मातृभाषा आणि संस्कृती यांच्या रक्षणास्तव आयोजित या महामेळाव्यात व्यासपीठावर मराठी व कोकणी भाषेचे नेते आणि शिक्षण तज्ज्ञ उपस्थित होते. प्रेक्षकांत भारतीय जनता पक्ष व महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते. व्यासपीठावरील मान्यवरांत भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या निमंत्रक तथा माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर, प्राचार्य सुभाष वेलिंगकर, नागेश करमली, भिकू पै आंगले, फा. माऊझिन्य आताईद, ऍड. स्वाती केरकर, पुंडलीक नायक, प्रा. अनिल सामंत, अरविंद भाटीकर, प्रा. पांडुरंग नाडकर्णी, नरेंद्र आजगावकर, प्रशांत नाईक, एन. शिवदास, गो. रा. ढवळीकर, ऍड. उदय भेंब्रे, प्रा. दत्ता भि. नाईक, गोविंद देव व प्रा. वल्लभ केळकर उपस्थित होते.
लढाईसाठी सिद्ध व्हा ः काकोडकर
यावेळी श्रीमती काकोडकर म्हणाल्या की, ही केवळ सुरुवात आहे. खरी लढाई पुढे लढायची आहे. त्यासाठी सर्वांनी सिद्ध राहिले पाहिजे. उद्दिष्ट साध्य होईपर्यंत स्वस्थ बसता येणार नाही, असा कानमंत्र यावेळी संपूर्ण गोव्यातून जमलेल्या लोकांना त्यांनी दिला. दोन समाजांत फूट पाडणारा हा विचार नाही. उलट चर्च संस्थेद्वारेच इंग्रजीचा वाद उरकून काढून दोन समाजांत दुफळी माजवण्याचे कार्य सुरू असल्याचा आरोप करतानाच त्याचे कागदोपत्री पुरावेही आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला.
देशी नाते तोडण्याचे षड्यंत्र ः भेंब्रे
विचारवंत ऍड. उदय भेंब्रे यांनी चर्च आणि त्यांच्या धर्मगुरूंना फैलावर घेत शेजारी राहणार्या विशाल अशा हिंदू धर्माकडे डोळे उघडून पहा, असा सल्ला त्यांना दिला. या हिंदू धर्माच्या शिकवणीने या देशाला थोर विचारवंत धर्मानंद कोसंबी, दादा वैद्य, रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर असे दिग्गज बहाल केले आहेत. वरवर ही इंग्रजी माध्यमाची मागणी असल्यासारखी दिसत असली तरी त्यामागे कोकणी आणि मराठी या देशी भाषा संपवून या भूमीपासून देशी नाते तोडण्याचे षड्यंत्र आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला. सांगे आणि केपे तालुक्यांत पाद्रींनी दबाव आणून ख्रिश्चन गावडा समाजाचा ‘धालो’ बंद पाडला. ख्रिस्तीकरणाच्या नावाखाली पाश्चात्त्यीकरण करण्याचे काम त्यांनी केले. पोर्तुगीज राजसत्तेला ४५० वर्षे जे गोव्यात करायला जमले नाही ते करण्याची जबाबदारी आता या उपटसुंभ मंत्र्यांना आणि चर्चला देण्यात आली आहे का, असा परखड सवाल त्यांनी उपस्थित केला. ‘तुम्हांला पोर्तुगालच्या मंचावर झोपायचे असेल तर झोपा किंवा इंग्लंडच्या फुटपाथवर बसून भीक मागा. आम्हांला त्याचे काहीही देणेघेणे नाही. मात्र येथून तोंड घेऊन चालते व्हा’, असा इशाराच त्यांनी इंग्रजीवाल्यांना दिला.
गोव्याची मातृभाषा इंग्रजी झाल्यास लोकांना मंदिरात इंग्रजीतून भजने म्हणावी लागणार, असा टोला नरेंद्र आजगावकर यांनी लगावला. गेल्या अनेक वर्षांत मराठी आणि कोकणी भाषेबद्दल वाद निर्माण करून आम्ही आमचेच नुकसान करून घेतले आहे, असे मत एन. शिवदास यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच, पालकांना खोटी माहिती देऊन त्यांच्याद्वारे इंग्रजीसाठी अनुदान मागण्याचा घाट डायसोसन सोसायटीने घातला असल्याचा आरोपही त्यांनी केला.
स्कॉटलंडमध्ये राणीची सत्ता असूनही त्या ठिकाणी इंग्रजी भाषा बोलली जात नाही. इंग्रजी भाषेतून शिक्षण झालेल्या मुलावर कोणते परिणाम होतात, हे पालकांना पटवून दिले पाहिजे. तसेच, कोणीही भारतीय भाषा सुरक्षा मंचाकडे खेळण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना विधानसभेतून थेट बाहेर फेकून दिले जाईल, असा सज्जड दम प्रशांत नाईक यांनी भरला.
हे निर्णायक युद्ध ः वेलिंगकर
आझाद मैदानावर मराठी - कोकणीचा परिवार एकत्र आलेला असून तो निर्णायक युद्धासाठी सज्ज झाला आहे. या युद्धात भारताविषयी प्रेम बाळगणार्यांचाच विजय होणार यात कोणतेही दुमत नाही. या चळवळीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करणार्यांचा डाव हाणून पाडला पाहिजे. शूर गोमंतकीय प्रत्येकवेळी गटबाजीमुळे गुलाम झाले. या इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा व्हायला देऊ नका, असे आवाहन यावेळी प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले.
भाषा हे पोट भरण्याचे
साधन नव्हे ः पुंडलीक नायक
भाषा ही पोट भरण्याचे साधन नसून ज्ञान संपादन करून मेंदू भरण्याचे ते साधन आहे, असे मत यावेळी ज्येष्ठ साहित्यिक पुंडलीक नायक यांनी व्यक्त केले. मुलगा जन्माला येताना केवळ पोट घेऊन येत नाही तर त्याला दोन हात आणि पायही असतात हे चर्च आणि डायसोसन सोसायटीने ध्यानात घ्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला. दिगंबर कामत यांनी आपल्या पालखीत माकडे बसवली असून ती आता उड्या मारायला लागली आहेत. बाबूश मोन्सेरात यांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही का केली होती, ते आता गोमंतकीयांना पटायला लागले आहे, असेही ते म्हणाले.
ज्या मुलांवर इंग्रजी माध्यम थोपवले जाते, त्या मुलांचे आई बाप त्यांना कत्तलखान्यातच पाठवत असतात, असे मत यावेळी प्रा. अनिल सामंत यांनी व्यक्त केले. संपूर्ण भारतात केवळ दोन लाख लोक आपल्या घरांत इंग्रजी भाषा बोलतात. गोव्यात इंग्रजी भाषेच्या मागणीमागे मोठे राजकारण असल्याचे अरविंद भाटीकर म्हणाले. परकीय भाषेतून शिक्षण घेणारा विद्यार्थी पोपटपंची करून शिक्षण घेतो तर मातृभाषेतून शिक्षण घेणार्याला ज्ञानप्राप्ती होते. त्यामुळे पालकांनी योग्य निर्णय घ्यावयाचा आहे, असे पांडुरंग नाडकर्णी म्हणाले.
त्यांना भाड्याची आई हवी ः करमली
काही विशिष्ट लोकांना समाजाचे तुकडे करायचे आहेत, असा दावा श्री. करमली यांनी केला. यांना स्वतःची आई नको तर भाड्याची आई हवी आहे. इंग्रजी माध्यम झाल्यास येत्या ५० वर्षांत आम्ही भारतीय नसून आम्हांला वेगळे राष्ट्र जाहीर करा, अशीही त्यांच्याकडून मागणी होऊ शकते. या लोकांना युरोपियन लोकांची भांडी धुण्यासाठीच इंग्रजी पाहिजे, असेही श्री. करमली म्हणाले.
इंग्रजी माध्यम झाल्यास कोकणी सुधारणार असेल तर तोमाझीन कार्दोज यांनी आपली सर्व तियात्रे इंग्रजीतून लिहावी, असे आव्हान भिकू पै आंगले यांनी दिले. तसेच, सर्व पालकांनी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून काढून भारतीय भाषेतूनच प्राथमिक शिक्षण द्यावे, अशी विनंतीही त्यांनी केली. आमच्या भाषेची ओळख आम्हीच संपवल्यास आमच्याच भूमीवर आम्ही परके होणार, अशी भीती फा. माऊझिन्य आताईद यांनी व्यक्त केली.
या जाहीर सभेचे सूत्रसंचालन सुभाष देसाई यांनी केले तर कोकणी व मराठी ठरावाचे वाचन वल्लभ केळकर यांनी केले. शेवटी राष्ट्रगीत म्हणून सभेचा समारोप करण्यात आला.
‘‘सध्या कॉंग्रेस मंत्रिमंडळात असलेले शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात, सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव, नगर विकासमंत्री ज्योकीम आलेमाव, महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा, माजी मंत्री मिकी पाशेको यांनी अर्ध्यावरच शाळा सोडली आहे. आणि हे सर्वजण इंग्रजी माध्यमातूनच शिक्षण घेत होते’’ - ऍड. उदय भेंब्रे
Thursday, 7 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment