मडगाव, दि.४ (प्रतिनिधी)
आके येथील भर वस्तीतील फ्लॅट फोडून तब्बल चार लाखांचे दागिने पळविण्याचा प्रकार ताजा असतानाच आज सकाळी पोलिस स्टेशनपासून हाकेवर असलेल्या एका बहुमजली इमारतीतील असाच आणखी एक फ्लॅट फोडून चोरट्यांनी सुमारे ३.३० लाखांचा ऐवज पळविला व त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील या वाढत्या चोर्या पोलिस यंत्रणेसाठी आव्हान ठरूं लागल्याचे दिसून आले.
कालच आके येथे पांडव कपेलाजवळील एका इमारतीतील पराग रायकर यांचा फ्लॅट फोडून सुमारे चार लाखांचे दागिने पळवल्याची तक्रार नोंदवली गेली होती. रायकर हे तीन दिवस बेळगावात होते व त्यामुळे त्यांचा फ्लॅट बंद होता. ते काल गोव्यात परतल्यावर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला होता.
हे प्रकरण ताजे असतानाच आज शिवराम विश्वनाथ नार्वेकर यांचा पोलिस स्टेशनच्या मागच्या बाजूकडील इमारतीत चौथ्या मजल्यावर असलेला फ्लॅट सकाळी फोडला गेला व चोरट्यांनी सुमारे ३ लाखांचे दागिने व रोख ३० हजार रुपये पळवले. नार्वेकर हे सकाळी नेहमीप्रमाणे बाहेर पडल्यावर सुमारे सव्वा अकरा वाजता त्यांची पत्नी आनंदी ही बोंबी निवासातील आपल्या मूळ निवासस्थानी पाडवा असल्याने दिवा लावण्यासाठी म्हणून गेली. तिने दाराला कुलूप लावून किल्ली शेजारणीकडे ठेवली व कामवाली आल्यास तिला किल्ली दे असे सांगून ती बाहेर पडली. सव्वाबाराच्या सुमारास सौ. आनंदी परतली असता तिला फ्लॅटचा मुख्य दरवाजा व आत कपाट फोडून सर्व सामान अस्ताव्यस्त टाकलेले आढळले. लगेच त्यांनी पोलिसात तक्रार नोंदवली.
चोरट्यांनी मुख्य दरवाजा व नंतर आतील कपाट, त्यातील सेफ लोखंडी सळ्यानी फोडून रोख ३० हजार, हार, मंगळसूत्र, हिर्याची अंगठी, अन्य १७ अंगठ्या, कर्णफुलांचे १५ जोड मिळून ११७ गॅम सोने पळवल्याचे तिच्या दृष्टीस पडले.
नंतर उपनिरिक्षक परेश नाईक यांनी पंचनामा केला व तपासासाठी श्वानपथक आणले; पण ते रेल्वे फाटकापर्यंत जाऊन थांबले. शहरात व विशेषतः भर वस्तीत हे रोजचे प्रकार होऊ लागले आहेत. यामागे सराईत टोळी की आणखी कोण ते कळू शकलेले नाही.
Tuesday, 5 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment