पणजी, दि. ६ (सांस्कृतिक प्रतिनिधी)
गोमंतकातील ज्येष्ठ कवी, नाटककार आणि लेखक विष्णू सूर्या वाघ आता लवकरच रुपेरी पडद्यावर झेप घेणार आहेत. धर्मानंद वेर्णेकर यांच्या ‘गड्या आपुला गाव बरा’ या आगामी चित्रपटात विष्णू वाघ महत्त्वाची भूमिका साकारत असून सध्या ते चित्रीकरणात व्यस्त आहेत.
गोव्यातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे विष्णू वाघ यांनी आत्तापर्यंत नाट्यलेखनातून तसेच कविता लेखन आणि सादरीकरणातून गोवा तसेच महाराष्ट्रात अमाप प्रसिद्धी मिळवली आहे. यापूर्वी आपल्या तसेच इतरांच्या अनेक नाटकांतून त्यांनी भूमिकाही साकारलेल्या आहेत. ‘तुका अभंग अभंग’, ‘आदित्य चक्षू’, ‘करीन ती पूर्व’, ‘साम्राज्य’ अशा नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत. त्यांच्या लेखणीतून साकारलेली ‘समुद्रपक्षी’, ‘काळ्या ढगांची सावली’, ‘तुका अभंग अभंग’, ‘सं. युद्ध नको मज बुद्ध हवा’, ‘आदित्य चक्षू’ अशा अनेक नाटकांना पुरस्कार लाभले आहेत. यावर्षी त्यांच्या ‘बाई मी दगुड फोडिते’ या नाटकाला महाराष्ट्र राज्य पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. आता मात्र गोमंतकातील हे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व थेट रुपेरी पडद्यावरच झेप घेणार आहे.
इथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू झाल्यापासून गोव्यातील निर्मात्यांनी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात जोर धरला असून गोव्यातही दर्जेदार चित्रपटांची निर्मिती होताना दिसते आहे. गोमंतक हा कला आणि संस्कृतीचा खजिना असून ही संस्कृती खर्या अर्थाने गावागावांतूनच जपली जाते. म्हणूनच गाव आणि ‘गावपण’ टिकणे नितांत गरजेचे आहे. याच आशयावरचा चित्रपट धर्मानंद वेर्णेकर निर्माण करत असून चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन त्यांचेच आहे. गोव्यातच चित्रित होणार्या या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे, मोहन आगाशे, दिलीप घारे, सुधीर निकम, सविता मालपेकर, शिल्पा अनासपुरे तसेच गोमंतकातील कलाकारही काम करत असून त्यात राजीव हेदे, प्रिन्स जेकब, मधुकर जोशी, सुनील देव, सतीश गावस, प्रशांती तळपणकर, धनू डिचोलकर, प्रदीप तळावलीकर, बबीता आंगले यांचा समावेश आहे. या चित्रपटासाठी मुकेश घाटवळ यांचे संगीत देणार असून सुरेश सुवर्णा हे सिनोमाटोग्राफर म्हणून काम पाहणार आहेत.
Thursday, 7 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment