लॉस एंजिल्स, दि. २६ : आपल्या पॉप संगीताने असंख्य चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकविणारा जगप्रसिद्ध गायक मायकल जॅक्सन याचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याने कोट्यवधी संगीतप्रेमी दु:खाच्या सागरात लोटले गेले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून तो आपल्या आजारपणामुळे चर्चेत होता. पण, अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याला रोनाल्ड रीगन युएलसीए सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. तेथे तो कोमात होता. डॉक्टरांनी त्याला वाचविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. पण, त्यांना यश आले नाही. कोमात असतानाच त्याचे निधन झाले. तो ५० वर्षांचा होता. जॅक्सन कुटुंबातर्फे त्याचा भाऊ जर्मेन जॅक्सन याने पत्रकारांनी ही माहिती दिली.
जॅक्सनच्या मृत्यूचे वृत्त पसरताच रुग्णालयाबाहेर असंख्य चाहते आणि प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी गोळा झाले. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांना रुग्णलयाबाहेर कडे तयार करावे लागले.
पॉपचा झंझावात
पॉप संगीताचे एक युग आपल्या नावे लिहिणाऱ्या मायकल जॅक्सनचे आयुष्य कायम वादाने घेरलेले होते. त्याचा जन्म २९ ऑगस्ट १९५८ मध्ये अमेरिकेतील इंडियाना येथील गॅरी येथे झाला. अतिशय गरिबीत जन्मलेल्या मायकल जॅक्सनने आपला प्रवास "जॅक्सन फाईव्ह' या बॅण्डद्वारे सुरू केला. हा बॅण्ड त्याच्या कुटुंबीयांचाच होता. या क्षेत्रात उतरल्यानंतर मजल दरमजल करीत त्याने यशाचे शिखर गाठले. या यशाची वाट खडतर पण प्रचंड कौतुकाने भरलेली होती. त्याने स्वबळावर मिळविलेले हे यश होते. आपल्या संगीताला नृत्याची जोड देत त्याने ब्रेक डान्स हा नृत्यप्रकार रुजविला.
"बिली जॉन' आणि "बॅड' यासारख्या सुपरहीट संगीताने त्याने जगभरात ख्याती मिळविली. १९८२ मध्ये आलेल्या "थ्रिलर'ने त्याला जगभरातील संगीतप्रेमींच्या हृदयासनावर अढळ स्थान मिळवून दिले. आंतरराष्ट्रीय स्तरावर संगीत क्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेचा समजला जाणारा ग्रॅमी पुरस्कार त्याला तब्बल १३ वेळा मिळाला. त्याच्या आवाजातील तब्बल ७५ कोटी रेकॉर्डस् विकल्या गेल्या होत्या. हा त्याच्या नावे जागतिक विक्रम असून, संगीत जगतातील ही सर्वोच्च विक्रीची नोंद मानली जाते. १९९६ ते ९७ या काळात त्याने जगभरातील ५८ शहरांमध्ये ८२ "लाईव्ह शो' केले. अखेरचा शो त्याने बारा वर्षांपूर्वी केला.
त्यानंतर तो वैयक्तिक जीवनातील घटना, आरोग्य आणि आर्थिक संकट यामुळेच अधिक चर्चेत राहिला. लहान मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपानंतर त्याच्यावर खटला भरण्यात आला. पाच महिने चाललेल्या सुनावणीनंतर त्याला या आरोपातून निर्दोष ठरविण्यात आले. याच काळात त्याला प्रचंड आर्थिक संकटाचाही सामना करावा लागला.
त्याच्या मागे तीन मुले आहेत. मिशेल जोेसेफ जॅक्सन ज्यु., पॅरिस मिशेल कॅथेरिन जॅक्सन आणि प्रिन्स ब्लॅंकेट मिशेल जॅक्सन अशी त्याच्या अपत्यांची नावे आहेत. त्यापैकी दोन मुले ३७ वर्षीय परिचारिका डेबी रोव्ह हिची आहेत. १९९७ मध्ये प्लॅस्टिक सर्जरीदरम्यान त्याची डेबीशी भेट झाली होती. त्यानंतर त्यांनी लग्न केले आणि दोन मुले झाली. पण, लगेचच १९९९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्याच्या तिसऱ्या मुलाची आई कोण, हे अजूनही जगासमोर आलेले नाही.
इस्लाम धर्माचा स्वीकार
आंतरराष्ट्रीय पॉप गायक असणाऱ्या मायकल जॅक्सनने इस्लाम धर्म स्वीकारला होता. त्यावेळी त्याने आपले नावही बदलले होते. त्याने आपले नाव मिकाईल असे केल्याचे वृत्त मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात जगभरातील प्रसार माध्यमांनी दिले होते. लॉस एंजिल्समध्ये त्याच्या मित्राच्या घरी झालेल्या कार्यक्रमात त्याने कुराणाच्या साक्षीने इस्लाम स्वीकारला होता.
------------------------------------------------------------------------------
पुनरागमनापूर्वीच 'एक्झिट'
गेल्या सात वषार्र्ंपासून आपल्या चाहत्यांपासून दूर असणारा हा पॉपचा बादशाह येत्या १३ जुलैला धडाक्यात पुनरागमन करणार होता. पुन्हा एकदा आपली गाणी आणि नृत्य घेऊन येणार होता. पण, हा नव्याने प्रवास सुरू होण्याआधीच तो अनंताच्या प्रवासाला निघून गेला. त्याच्या अकाली निधनाने संगीत जगतावर शोककळा पसरली असून पाश्चिमात्य देशातील त्याचे चाहते तर आपले अश्रू आवरू शकत नाहीत.
Saturday, 27 June 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment