ज्ञानेश्वर मांद्रेकर यांचे मोठे योगदान
वाळपई, दि. २२ (प्रतिनिधी)- गेले सहा महिने धावे परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर दि. २१ रोजी रात्री १२ च्या सुमारास जेरबंद झाला.
धावे गाव तसेच शेजारील गावांतील लोकांना हा बिबट्या त्रास करत होता. आपले प्रमुख अन्न म्हणून गावातील पाळीव प्राण्यांवर त्याने लक्ष केंद्रित केले होते. गावातील कुत्रा, म्हशी, गुरे यांच्यावर हल्ला करून तो मारून खात असे. त्यामुळे वाघाच्या भीतीने गावातील लोक गुरांना चरण्यास सुद्धा सोडत नसत. काही लोकांना दुपारच्या वेळी सुद्धा तो दृष्टीस पडत असे. गेल्या महिन्यात एका खासगी बसला अडवून धरले होते. घरातील अंगणात बांधलेल्या कुत्र्यांना तो रात्रीच्यावेळी हल्ला करत असे. काही दिवसापूर्वी महेश मणेरीकर याच्या वासरावर झडप घालून त्याने जखमी केले होते. मणेरीकर यांना कुत्रा भुंकल्यावर व गाय हंबरल्याने लगेच जाग आली. त्यांनी गोठ्यातील दिवे लावले, त्याच क्षणी गोठ्यातील बिबट्या तेथून पसार झाला.
काही वेळाने वाघ काही अंतरावरील ज्ञानेश्वर मांद्रेकर यांच्या घराजवळील पिंजऱ्यात बांधलेल्या कुत्र्याला मारण्यासाठी गेला असावा व तिथेच तो पिंजऱ्यात अडकला गेला. त्यावेळी वाघाने मोठ्याने गर्जना केली. हा आवाज ऐकताच ज्ञानेश्वर आणि घरातील मंडळी जागी झाली व पाहतात तर वाघ पिंजऱ्यात अडकला होता व मोठमोठ्याने ओरडत होता.
दि. १९ मे रोजी धावे गावातील उदय मांद्रेकर यांच्यावर हल्ला करून याच बिबट्याने त्यांना गंभीर जखमी केले होते. त्यांच्या डोक्याला ५५ टाके पडले होते. मांद्रेकर यांनी मोठ्या धाडसाने वाघाला प्रतिकार केल्याने व कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे वाघ त्यावेळी पसार झाला होता. त्यावेळी वनाधिकाऱ्यांनीही जागेची पाहणी केली होती व वाघाला आपण जेरबंद करतो असे आश्वासन पण दिले होते. पण त्यानंतर वनाधिकारी गावात फिरकलेच नाहीत. दै. गोवादूत मधून यासंबंधी अनेक वेळा वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्ताची दखल घेऊन वनाधिकाऱ्यांनी १५ दिवसापूर्वी मांद्रेकर यांच्या काजूच्या बागायतीत पिंजरा लावून ठेवला होता व भक्ष्य म्हणून एका कुत्र्याला ठेवण्यात आले होते. पण त्यानंतर वाघ तिथे फिरकलाच नाही. म्हणून वनाधिकाऱ्यांनी परत धावे गावात येऊन तो पिंजरा ज्ञानेश्वर मांद्रेकर यांच्या घराच्या जवळच ठेवला. ज्ञानेश्वर मांद्रेकर रोज डोळ्यात तेल घालून रात्रीच्यावेळी पहारा ठेवत असत. पिंजऱ्यावर घालण्यात येणारी झाडे झुडपे (वाघाला फसविण्यासाठी) घालण्याचे कामही ज्ञानेश्वर करीत असे. कुत्र्याला सकाळी बाहेर काढण्यात येत असे व सायंकाळी पुन्हा पिंजऱ्यात ठेवण्यात येत असे. चार दिवसांपूर्वी वनाधिकारी येऊन सांगू लागले की वाघ आता येण्याची चिन्हे काही दिसत नाहीत, त्यानुसार आज २१ रोजी पिंजरा काढून नेण्याचे निश्चित केले होते. दि. २१ रोजी रात्री शांतादुर्गा मंदिराजवळ कुत्र्यांनी मोठमोठ्याने ओरडण्यास सुरुवात केली. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्याचवेळी वाघ तिथून गेला असावा. त्यावेळी वेळ साधारण ११.३० ची होती. त्यानंतर वाघ ज्ञानेश्वर यांच्या घराजवळील पिंजऱ्यात बांधलेल्या कुत्र्याला मारण्यासाठी गेला असावा. बिबट्या अडकल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. १००-२०० लोकांची गर्दी झाली. लगेच बोंडला येथून अधिकारी लोक दाखल झाले. सध्या वाघ बोंडला अभयारण्यात आहे.
ज्ञानेश्वराचे मोठे योगदान
हा बिबट्या वाघ पकडण्यात ज्ञानेश्वर मांद्रेकर यांचे मोठे योगदान असल्याचे गावातील लोकांचे म्हणणे आहे. लोकांनी या धाडसाबद्दल त्यांचे कौतुक केले आहे. यावेळी क्षेत्रीय वनाधिकारी विश्वास चोडणकर व पिंगुळकर हजर होते.
Tuesday, 23 June 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment