Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 27 June 2009

निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवावाढ देण्याचा घाट!

सरकारी कर्मचारी संघटनेचा कडवा विरोध
पणजी, दि. २६ (प्रतिनिधी): सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षांवर नेल्यानंतरही आता ३० जून रोजी निवृत्त होत असलेल्या काही सरकारी अधिकाऱ्यांनी सेवावाढीसाठी प्रयत्न सुरू केल्याने त्याला गोवा सरकारी कर्मचारी संघटनेने तीव्र आक्षेप घेतला आहे. कोणत्याही स्थितीत या अधिकाऱ्यांना सेवावाढ दिल्यास सरकारविरोधात जोरदार आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
सरकारी नोकरीत ६० वर्ष पूर्ण होणारे काही अधिकारी ३० जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यातील काहींनी मुदतवाढ किंवा कंत्राटी पद्धतीने सरकारी सेवेत पुन्हा चंचूप्रवेश करवून घेण्यासाठी निकराने प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, त्यांना मुदतवाढ देण्यास गोवा सरकारी कर्मचारी संघटनेने तीव्र आक्षेप घेतला असून याविरुद्ध आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
गोवा सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एम. एल. शेटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्मचारी संघटनेच्या कार्यकारी समिती आणि तालुका समितीने घेतलेल्या निर्णयानुसार वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या कोणत्याही सरकारी कर्मचारी किंवा अधिकाऱ्याच्या सेवावाढ किंवा त्याची कंत्राटी पद्धतीवर निवड करायला तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे सर्व तालुका समितीच्या स्थानिक पातळीवर बैठका घेण्याचा निर्णय घेतला असून अशा प्रकारच्या मुदतवाढ व कंत्राटी पद्धतीविरुद्ध आवाज उठविण्याचे ठरवले आहे.
सरकारने निवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांना सेवावाढ देण्याचा आततायीपणा सरकारने करू नये. तसे केल्यास कर्मचारी संघटनेचा रोष ओढवून घेऊन राज्य सरकार व कर्मचारी यांच्यात कटुता निर्माण होईल. तसे होऊ नये अशी मागणी शेटकर यांनी केली आहे.
राज्य सरकारने ३० जून रोजी निवृत्ती होणाऱ्या अधिकाऱ्यांना सेवावाढ दिल्यास त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागेल व त्याची सर्व जबाबदारी सरकारवर राहील असा इशाराही संघटनेने दिला आहे.

No comments: