सर्वसमावेशक हिंदुत्वावर भाजप ठाम
नवी दिल्ली, दि. २१ - भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे संपूर्ण विश्लेषण करून पक्षाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पक्षाच्या केंद्रीय संघटनेबरोबरच सर्व स्तरावर मोठी सुधारणा घडवून आणण्याचे संकेत देतानाच पक्षाने आता युवा नेतृत्वाला पुढे आणण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.
लोकसभेतील अनपेक्षित पराभवानंतर राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पहिल्याच बैठकीतील समारोपाच्या प्रसंगी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात अडवाणींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्व यांच्यापासून विलग होण्याच्या भूमिकेला पूर्णपणे नामंजूर केले आणि सांगितले की कोणीही आपल्या मुळांपासून वेगळा होऊ शकत नाही.
हिंदुत्वाचा मुद्दा हा आवश्यकच आहे; मात्र त्याच्या संकुचित अर्थापासून आणि हिंदुत्वाच्या मुस्लिमविरोधी व्याख्येपासून आपण दूर राहण्याची आवश्यकता आहे, असे सांगून अडवाणी पुढे म्हणाले की, कार्यकारिणीच्या केंद्रीय बैठकीआधी एक दिवस आपल्या दोन मुसलमान सहकाऱ्यांनी (मुख्तार अब्बास नकवी आणि शाहनवाज हुसेन) यांनी हिंदुत्वावरील आपली आस्था स्पष्ट केली आहे, पण ते करत असतानाच त्यांनी हिंदुत्वाचा "मुस्लिमविरोधी' एवढाच संकुचित अर्थ घेतला जाण्याच्या भूमिकेपासूनही आपण स्वतःला परावृत्त केले पाहिजे असे सांगितले आहे.
पक्षात युवकांना विशेष प्राधान्य दिले जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करून अडवाणी म्हणाले की, पक्षाने प्रत्येक स्तरावर युवकांना प्राधान्य देण्याची भूमिका घेतली पाहिजे व तशी योजना बनवली पाहिजे. आपल्याला अधिक प्रभावी कार्य करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात नसल्याची तक्रार अनेक युवकांनी केल्याचे ते म्हणाले. पक्षात रेल्वेच्या डब्यातील माणसांसारखी मानसिकता तयार झाली असल्याचे त्यांनी सांगितले. जे नेते सध्या नेतृत्वाच्या स्थितीत आहेत ते डब्याबाहेर असलेल्या नव्या, प्रतिभावान आणि उदयोन्मुख कार्यकर्त्यांना डब्याच्या आत येण्याची संधीच देत नाहीत. युवकांची उपेक्षा करण्याची ही मानसिकता अत्यंत घातक असून ती बदलली गेली पाहिजे असे सांगून ते म्हणाले की, पक्षाने पुढील वीस वर्षांचा विचार करून भविष्यातील योजना बनवण्याची गरज आहे.
पक्षसंघटनेत राष्ट्रीय स्तरापासून सर्वच स्तरांवर खूप मोठी सुधारणा घडवून आणण्याचे सुतोवाच करताना ते म्हणाले की, पक्ष कार्यकर्त्यांना असे वाटते आहे की पक्षात तात्त्विक मतभेदांबरोबरच सर्व विचार मांडले जाण्याची एक प्रभावी पद्धत विकसित केली गेली पाहिजे. त्याचबरोबर पक्षातील अंतर्गत मतभेदांना सार्वजनिक रूप देण्यापासूनही आपण वंचित राहायला हवे असेही ते म्हणाले.
पक्षशिस्त मोडणाऱ्यांची
आता गय नाही...
भारतीय जनता पक्षात सुरू असलेल्या "मानापमान' नाटकाला कंटाळलेल्या लालकृष्ण अडवाणी यांनी आता पुन्हा एकदा सगळी सूत्रे आपल्या हातात घेण्याचे संकेत दिले आहेत.
पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आरोप- प्रत्यारोप सुरू झाल्यानंतर अडवाणी यांनी शिस्त मोडणाऱ्या नेत्यांना सुनावले असून, शिस्तीत राहा अन्यथा चालते व्हा असा इशारा त्यांनी या नेत्यांना दिला आहे.
पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू असून, निवडणुकांतील पराभवावर यात मंथन सुरू आहे. बैठकीत अडवाणी यांनी पक्षाला आलेली मरगळ झटकण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अडवाणी देशव्यापी दौरा करणार असून, पक्षात शिस्त मोडणाऱ्याची आता गय नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.
Monday, 22 June 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment