भाजपचा कॅसिनोचालकांना गंभीर इशारा
पणजी,दि.२३ (प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्ष सरकारच्या कार्यकाळात एकाही तरंगत्या कॅसिनोला परवाना देण्यात आला नाही किंवा परवान्याचे नूतनीकरणही करण्यात आले नाही. सध्या काही कॅसिनो चालक भाजपच्या विरोधात विनाकारण बोंबा मारत सुटले आहेत. भाजपने कॅसिनो विरोधातील आपला लढा तीव्र केल्याने जनतेच्या मनात गैरसमज पसरवण्यासाठी ही "गोबेल्स' पद्धत राबवली जात असून कॅसिनो चालकांनी आपल्या जिभेला लगाम घातला नाही तर भाजप त्यांना चोख उत्तर देईल,अशा इशारा भाजप विधिमंडळ गटाचे प्रवक्ते आमदार दामोदर नाईक यांनी दिला.
आज इथे बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप विधिमंडळ गट उपनेते आमदार फ्रान्सिस डिसोझा यावेळी उपस्थित होते.कॅसिनो जहाजांना दिलेल्या परवाना व्यवहारात महाघोटाळा झाला आहे. विविध खात्यांकडून कायदा धाब्यावर बसवून कॅसिनो जुगाराला दिलेल्या परवानगी घोटाळ्याचा पर्दाफाश विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केला. याप्रकरणी सरकारच्या भानगडी उघडकीस आल्याने एकीकडे नेत्यांची बोलती बंद झाली असताना दुसरीकडे कॅसिनो मालकच सरकारच्या बाजूने बोलायला लागले आहेत.भाजपच्या आरोपांना सरकारने खुलासा करण्याची आवश्यकता आहे. कॅसिनो मालक जर भाजपवर खोटे आरोप करीत असतील किंवा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्याबाबत गैर बोलत असतील तर त्यांना सडेतोड उत्तर देण्यास भाजप समर्थ आहे, असा इशाराही दामोदर नाईक यांनी दिला.कॅसिनो चालकांनी भाजपवर टीका करण्याचे सत्र ताबडतोब बंद केले नाही तर त्यांना कायदेशीर उत्तर द्यावेच लागेल, असेही ते म्हणाले. दरम्यान, भाजप सरकारच्या काळात कॅसिनोचा परवाना संपूनही दोन महिने त्यांनी बेकायदा व्यवहार केला पण सदर कॅसिनोच्या परवान्याचे नूतनीकरण मात्र भाजपने केले नाही,असा खुलासा आमदार फ्रान्सिस डिसोझा यांनी केला.भाजपच्या काळात एक चूक घडली असेलही पण याचा अर्थ कॉंग्रेसने त्याच्या दहा पट चुका कराव्यात ही गोष्ट निरर्थक असल्याचा टोलाही यावेळी श्री.डिसोझा यांनी हाणला.
Wednesday, 24 June 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment