Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 23 June 2009

केंद्राकडून पेट्रोल दरवाढीचे संकेत!

पेट्रोल २ रू., डिझेल १ रू. प्रतिलीटर वाढणार
नवी दिल्ली, दि. २२ - केंद्र सरकारकडून लवकरच पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर दोन रुपये तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर एक रुपयाने वाढ केली जाईल, असे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे महागाईने मेटाकुटीला आलेल्या सामान्य माणसाचे जगणे आणखी कठीण होणार आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या या इंधनाच्या दरांशी समानता आणण्यासाठी ही वाढ करणे अटळ असल्याचे सरकारी सूत्रांनी म्हटले आहे. सध्या इंडियन ऑईल, हिंदुस्थान पेट्रोलियम व भारत पेट्रोलियम या सरकारी क्षेत्रातील पेट्रोल कंपन्यांना दररोज १३५ कोटी रुपयांचा तोटा सोसावा लागत आहे. त्यामुळे तेलनिधीतील वार्षिक तूट ३८ हजार, ७०० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून भारताला प्रतिपिंप ७०.४९ डॉलर्स दराने तेलाची आयात करावी लागत आहे. गेल्या महिन्यात हे दर ५९ डॉलर्स प्रतिपिंप असे होते. त्यामुळे दरवाढीला पर्याय नाही, असे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे. कारण डिझेलवर सध्या सरकारला प्रतिलिटर २ रुपये ९६ पैसे अनुदान द्यावे लागत आहे. तसेच पेट्रोलवर ६ रुपये ८ पैसे अनुदान द्यावे लागत आहे. यातील तोट्याचा काही भाग खरेदीदारांनी सोसावा व उरलेला भार सरकार तेलरोखे काढून सोसेल, असे हे सगळे गणित आहे. जर केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी पेट्रोल व डिझेलवरील सीमाशुल्कात कपात केली तरच ग्राहकांना संभाव्य दरवाढीचा फटका बसणार नाही. सध्या पेट्रोलवर प्रतिलिटर ११.३५ रुपये सीमाशुल्क आकारले जाते, तर डिझेलवर १.६० रुपये सीमाशुल्क आकारले जाते. त्याखेरीज या दोन्ही इंधनांवर "रोड सेस' म्हणून प्रतिलिटर दोन रुपये वसूल केले जातात. तेसुद्धा ग्राहकांच्या खिशातून. म्हणजेच प्रत्यक्षात अल्प दरात हे इंधन उपलब्ध होऊनही करांच्या ओझ्याखाली त्यांचे दर वाढत जातात, असे दिसून येते. त्याचा फटका अंतिमतः सामान्य माणसालाच बसतो. शिवाय एकदा इंधनाच्या दरात वाढ झाली म्हणजे वाहतुकीचे दरसुद्धा वाढतात व त्यामुळे महागाईला आयतेच आमंत्रण मिळते. हे टाळण्यासाठी इंधनाच्या दरांवर सरकारने प्रभावीरीत्या नियंत्रण ठेवावे व त्याचा फटका कोणत्याही स्थितीत सर्वसामान्यांना बसणार नाही यादृष्टीने प्रयत्न करावेत, अशी मागणी केली जात आहे. पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी ही संभाव्य इंधन दरवाढ केव्हा होणार याबद्दल नेमका खुलासा केलेला नाही. तथापि, लवकरच सरकारकडून ही दरवाढ घोषित केली गेली तर त्याबद्दल आश्चर्य वाटू नये.

No comments: