पणजी, दि. २६ (प्रतिनिधी) : गोवा पोलिस खात्यातर्फे "रॉबिन' ही दुचाकीवरून गस्त घालणारी सेवा येत्या सोमवार पासून संपूर्ण राज्यात सुरू केली जाणार आहे. रस्त्यावर वाहनांची होणारी कोंडी लक्षात घेता कोणत्याही ठिकाणी त्वरित पोलिस पोचण्यासाठीही ही नवी सेवा उपयुक्त ठरणार आहे. यासाठी खात्याने बजाज कंपनीच्या ३० नव्या कोऱ्या "पल्सर' दुचाकींची खरेदी केली असून राज्यातील प्रत्येक पोलिस स्थानकाला दोन दुचाक्या पुरवल्या जाणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी दिली. यापूर्वी गोवा पोलिसांची "रोर्बोट' ही "जिप्सी' वाहनांची गस्त घालणारी सेवा सुरू आहे.
शंभर क्रमांकावर दूरध्वनी करून कोणत्याही घटनेची माहिती देताच सुसाट वेगाने मदत कार्यासाठी पळणाऱ्या पोलिस नियंत्रण कक्षाच्या वाहनाबरोबर ही "रॉबिन' सेवा येत्या सोमवारपासून गोव्यात गस्त घालताना पाहायला मिळणार आहे. एका दुचाकीवर दोन पोलिस तैनात केले जाणार असून त्यांना बिनतारी संदेशाद्वारे आदेश दिले जाणार आहे. कोणत्याही घटनेची माहिती देणारा दूरध्वनी पोलिस नियंत्रण कक्षात येताच ती माहिती टिपून घेतली जाईल व त्यानंतर ती माहिती जवळ असलेल्या या "रॉबिन' पोलिसांना दिली जाणार आहे. त्यामुळे गल्लीबोळातही या दुचाक्या चोरांचा पाठलाग करीत घुसणार आहेत. या सेवेमुळे दुचाकीवरून फिरून लूटमार करणाऱ्या लुटारूवर अधिक लक्ष केंद्रित करता येणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक ठिकाणी पोलिसांना नजर ठेवण्यास मदत होणार असल्याचे मत श्री. देशपांडे यांनी व्यक्त केले.
येत्या २९ जुलै रोजी राज्याचे गृहमंत्री रवी नाईक यांच्या हस्ते या रॉबिन सेवेचा शुभारंभ केला जाणार आहे. आल्तिनो येथील पोलिस प्रशासकीय इमारतीत होणाऱ्या या कार्यक्रमात पोलिस दलाचे महासंचालक भीमसेन बस्सी, पोलिस महासंचालक के डी. सिंग तसेच अन्य पोलिस अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
Saturday, 27 June 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment