मडगाव, दि. २१ (प्रतिनिधी) - माजोर्डा पंचतारांकित हॉटेलातील कॅसिनोप्रकरण पर्यटन मंत्री मिकी पाशेको यांच्यासाठी महागात पडणार असल्याची चिन्हे दिसत असून त्यामुळे त्यांना मंत्रिपदावरून हटवून आपल्या सरकारची प्रतिमा उंचावण्याचा खटाटोप मुख्यमंत्री दिगंबर कामत करतील व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेही त्याला अनुकूल असल्याचे वृत्त आहे. तसे झाले तर मुख्यमंत्र्यांची एक मोठी डोकेदुखी त्यामुळे दूर होणार आहे.
माजोर्डा येथील कॅसिनो प्रकरण संपूर्णतः पर्यटनमंत्र्यांच्या विरोधात गेले आहे व स्थानिक पोलिस त्याचा तटस्थपणे तपास करू शकणार नाहीत हे दिसून आल्यानंतरच सरकारने त्या प्रकरणाचा तपास गुन्हा अन्वेषण विभागाकडे देण्याचा निर्णय घेतला व मिकीविरोधी कारवाईची ती पहिली पायरी असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जाते.
मिळालेल्या माहितीनुसार कॅसिनोप्रकरणी दिल्लीहून गोवा पोलिसांना कानपिचक्या मिळाल्यानंतर सरकारने या प्रकरणात गांभिर्याने लक्ष घातले व त्यानंतरच कॅसिनोचालकाने मिकीविरुध्द दिलेली तक्रार नोंदली गेली व त्यानंतर एकंदर प्रकरणाचा उलगडा होत गेला व सरकारला तें गुन्हा अन्वेषण विभागाकडे देण्यावाचून प्रत्यवाय राहिला नाही.
सरकारसाठी विशेषतः मुख्यमंत्र्यांसाठी मिकी ही व्यक्ती नेहमीच उपद्रवी ठरलेली आहे, या पूर्वीच्या दोन्ही मुख्यमंत्र्यांनीही त्यांचा हाच अनुभव घेतला होता. वीज खाते इंजिनियर मारहाण प्रकरण, वाहकाला मारहाण,आताचे कॅसिनोप्रकरण तसेच त्यांच्या विरुध्द त्यांच्या पत्नीने दाखल केलेले कौटुंबिक छळाचे खटले या सर्वांचा अहवाल आता दिल्लीत कॉग्रेस हायकमांडला सादर करून त्यांच्याविरुध्द कारवाईची परवानगी मागितली गेली आहे, असे वृत्त आहे.
आज तर एका स्थानिक वृत्तवाहिनीने ताज्या कॅसिनोप्रकरणाचा खास वृत्तांत प्रसिध्द करून पर्यटनमंत्र्यांना अक्षरशः उघडे पाडलेले आहे. दुसरीकडे या मिकीविरोधी मोहिमेमुळे सरकारातील त्यांच्या विरोधकांना आनंदाच्या उकळ्या फुटलेल्या असून त्यांनी या वृत्ताताची प्रत काढून ती दिल्लीत पाठविल्याचे कळते.
पर्यटनमंत्र्याविरुध्द एकामागोमाग एक अशा प्रमाणात बाहेर येऊ लागलेल्या प्रकरणामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येही मिकींसाठी प्रतिकूल वातावरण तयार झालेले आहे व शरद पवार हेही त्यांच्यावर नाराज झालेले आहेत. या संधीचा लाभ मुख्यमंत्री घेतील व त्यांना मंत्रिमंडळातून वगळून एकतर पांडुरंग मडकईकर वा निळकंठ हळर्णकर यांना संधी देतील अशी हवा राजकीय वर्तुळात निर्माण झालेली आहे व सरकारची प्रतिमा सुधारण्यासाठी श्रेष्टींकडूनही या बदलास कोणतीही आडकाठी होणार नाही, असे बोलले जात आहे.
Monday, 22 June 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment