Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 18 May 2009

संघनेत्यांनी घेतली अडवाणींची भेट

नवी दिल्ली, दि. १७ ः भाजपच्या अनपेक्षित पराभवानंतर ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली व पराभवाच्या कारणावर चर्चा केली. अडवाणी यांनी पद सोडण्याचा अथवा निवृत्त होण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्याबाबत संघाने त्यांना कोणताही सल्ला दिलेला नाही, असे रा.स्व.संघाचे प्रवक्ते राम माधव यांनी पत्रकारांना सांगितले. विरोधी पक्षनेतेपदाबाबतचा अंतिम निर्णय त्यांनी स्वतः व भाजपने घ्यायला हवा, याबाबत संघ कोणतेही मत व्यक्त करणार नाही, असे श्री. माधव यांनी स्पष्ट केले. संघाचे ज्येष्ठ नेते मदनदास देवी, सुरेश सोनी व भय्याजी जोशी यांनी अडवाणी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
भाजपचा पराभव धक्कादायक असून, त्यावर विचारविनिमय करून पक्ष नेतृत्वाने योग्यवेळी निर्णय घ्यावा, असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. पक्षात युवानेत्यांना वरचे स्थान दिले जाईल का, असा प्रश्न त्यांना पत्रकाराने विचारला होता. भाजपच्या पराभवाचे कारण शोधण्यासाठी संघाने समिती नेमल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला.
दरम्यान, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी अडवाणी हेच आमचे नेते असून, तेच यापुढे विरोधी पक्षनेते असतील, असे सांगितले तर अडवाणी यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचे मत मुरलीमनोहर जोशी यांनी व्यक्त केले आहे.

No comments: