Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 19 May 2009

'ग्रुप ऑफ सेव्हन'च्या एकीला सुरुंग?

पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): केंद्रात संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला मिळालेल्या यशामुळे उत्साहित झालेल्या राज्यातील कॉंग्रेस नेत्यांनी आता सरकारमधील मतभेदांवर तोडगा काढण्याची नवी योजना आखली आहे, असे समजते. विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा देणाऱ्या बिगरकॉंग्रेस "ग्रुप ऑफ सेव्हन' गटातील नेत्यांच्या एकीला सुरुंग लावून या गटाचे "उपद्रवमूल्य' तात्काळ संपवण्याचा चंगच काही कॉंग्रेस नेत्यांनी आखला असून त्यासंदर्भात व्यूहरचना आखण्याचे कामही सुरू झाल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या अपयशामुळे निर्माण झालेल्या अनुकूल स्थितीचा लाभ घेऊन राज्यातही कॉंग्रेसचे वारे पसरवण्याची शक्कल काही नेत्यांनी लढवली आहे. राज्यातील आघाडी सरकारात सुरू असलेल्या अंतर्गत वादावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री कामत यांनी कडक धोरण अवलंबिण्याची गरज असल्याचे मत त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. दिल्लीहून परतल्यावर मंत्रिमंडळ फेररचनेबाबत ठोस भूमिका ते घेणार असल्याचेही वृत्त कॉंग्रेस गोटात पसरले आहे. सध्याच्या परिस्थितीत सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव व वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांच्याविरोधातील रोष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सुदिन ढवळीकर यांच्या मडकई मतदारसंघातून भाजपला भरघोस मताधिक्य मिळाल्याचे कारण आता त्यांच्या विरोधकांकडून पुढे केले जात आहे. नावेली हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला असूनही यावेळी कॉंग्रेसला केवळ अल्प मतांची आघाडी मिळाल्याने चर्चिल यांनीही सार्दिन यांच्याविरोधात काम केल्याची भावना पसरली असल्याने या दोघांही नेत्यांची मंत्रिपदे काढून घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ढवळीकरबंधु हे सध्या केवळ आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या आश्रयावर आघाडी सरकारात टिकून आहेत. सुदिन यांच्या मंत्रिपदाला धोका संभवल्यास विश्वजित यांच्याकडून विरोध होईल,अशी संभावना असल्याने आता आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनाच कॉंग्रेस प्रवेशाचा प्रस्ताव सादर करण्याचा विचारही सुरू झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी हा प्रस्ताव कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल गांधी यांच्यामार्फत पुढे करण्याचा विचारही सुरू झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. विश्वजित कॉंग्रेसमध्ये आल्यास आपोआप या गटाचे वर्चस्व संपुष्टात येईल असाही विचार केला जात आहे.
मुख्यमंत्री दिगंबर कामत हे सध्या दिल्लीत आहेत. ते गोव्यात परतल्यावर मंत्रिमंडळ फेररचनेचा विषय प्रामुख्याने चर्चेला येणार अशी माहिती कॉंग्रेस पक्षातील सूत्रांनी दिली. कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर यांना पुन्हा मंत्रिपदी आरूढ करण्याबरोबर उपसभापती मावीन गुदिन्हो यांचाही मंत्रिपदासाठी विचार करावा,अशी मागणी पुढे येत आहे. चर्चिल व आलेक्स रेजिनाल्ड लोरेन्सो यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार असल्याने त्यांचे भवितव्य सभापती प्रतापसिंग राणे यांच्यावर अवलंबून आहे. सरकारच्या अंतर्गत कलहामुळे राज्यात कॉंग्रेसची होत असलेली बदनामी यापुढे अजिबात चालू देऊ नये,असेही यावेळी ठरवण्यात आल्याचेही कळते.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणूक काळात घेतलेली संभ्रमित भूमिका व स्वतःला पंतप्रधानपदाचे दावेदार असल्याचे निर्माण केलेले वारे यामुळे त्यांचे महत्वही कमी झाले आहे. संपुआचे ते घटक जरी असले तरी त्यांना आता पूर्वीसारखे महत्त्व नसणार या चिंतेने येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदारही काही हिरमुसले आहेत.कॉंग्रेसशी जुळवून घेतल्यासच आपले स्थान सुरक्षित राहील,यामुळे त्यांच्याकडूनही यापुढे आढेवेढे घेतले जाणार नाही,असेही संकेत मिळत आहेत.
दरम्यान, याप्रकरणी निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार मुख्यमंत्री कामत यांना श्रेष्ठींकडून मिळाल्याने ते नक्की काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

No comments: